- डॉ. भूषण केळकर
आजचा संवाद हा या लेखमालेचा आणि 2018च्या स्तंभलेखनाचा शेवटचा लेख.. या वर्षात तंत्रज्ञान केवढं तरी बदललं आहे! कित्येक अशक्यप्राय आणि गंमतही वाटेल असे बदल घडून आले आहेत! काही उदाहरणं बघा.
‘रोक्को’ नावाचा एक पोपट अँमेझॉनच्या ‘अँर्लक्झा’वरून काही गोष्टींचं शॉपिंग करतोय!‘इडियट’ हे टाइप केलं तर गूगलवर डोनाल्ड ट्रम्प आणि ‘भिकारी’ टाइप केलं तर इम्रान खान स्क्रीनवर येतात!
‘उबर’ आणि ‘ओला’ यांच्यामुळे गाड्याचं उत्पादन 6 टक्के कमी झालंय आणि विक्री 3 टक्के घटली आहे!
‘रोबोट’ आणि इंड्रस्ट्री 4.0 मधील एआय हे मानवाला धोकादायक ठरू शकतील असं अनेक विख्यात शास्त्रज्ञ म्हणू लागलेत!
जनुकीय प्रणालीत बदल करून, तंत्रज्ञानाने हवी तशी पिढी घवडता येईल आणि असे ‘सुपरह्युमन्स’ बनवणं ही केवळ र्शीमंतांची मक्तेदारी बनेल असं स्टीफन हॉकिंग म्हणून गेले.
पूर्ण जगाला लागणा-या वर्षभराच्या ऊर्जेच्या वापराएवढी ऊर्जा केवळ 40 मिनिटांत पृथ्वीवर पडणा-या सौरऊर्जेने मिळते असं सिद्ध झालंय आणि ती ऊर्जा मिळवण्यात या वर्षात खूप प्रगती झाली आहे.
2015 ते 2018 या काळात नोकरभरतीत 23 टक्के प्रमाण घटलं आहे आणि त्याचं कारण आहे तंत्रज्ञानाचा अधिक वापर!
आइनस्टाइन असं म्हणून गेलाय की संगणक हे वेगवान अचूक आणि मूर्ख असतात, मानव हे कमी वेगवान, चुका करणारे पण सर्जनशील असतात आणि म्हणून मानव व संगणक यांनी एकत्रित काम करण्यानं अशक्यप्राय कोटीतील प्रगती साधता येईल!इंडस्ट्री 4.0 ही वस्तुत: आइनस्टाइनचं वाक्याचं मूर्त रूप होय! एआय/ व्हीआर आणि क्लाउड व बिग डाटा या सर्वांवर आणि (सायबर फिजिकल) गोष्टींनी नटलेली ही चौथी औद्योगिक क्रांती. याचा जगावर प्रचंड वेगाने परिणाम होतोय तसा भारतावर पण होतोय; पण आपण एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवूया ते म्हणजे भारताचं स्केल किंवा प्रमाण!जेफरी वेस्ट यांचं ‘स्केल’ नावाच्या पुस्तकात त्यांनी असमान व व्यस्त प्रमाणाबद्दल एक उदाहरण दिलंय. एका मांजराला जेवढा औषधाचा डोस दिला होता त्याच प्रमाणातला डोस हत्तीला दिला तर बरा होण्याऐवजी हत्ती मेला. कारण नंतर लक्षात आलं की जेवढं औषध मांजराला दिलं होतं त्यापेक्षा अगदीच थोडं जास्त औषध हत्तीला द्यायला हवं होतं. केवळ आकारानुसार प्रमाण वाढवणं काही लाभलं नाही. म्हणजे मुद्दा हा आहे की जी मात्रा पाश्चिमात्य देशांना लागू पडेल ती तशीच किंवा तशा प्रमाणात भारत देशाला लागू पडेल असं अजिबातच नाही!
खरं तर या औद्योगिक क्रांती 4.0चं आपण स्वागतच करायला हवं. गरज आहे ती योग्य मॅनेजमेंटची.
आपल्याकडे आपण म्हणतो की, कोणतंही अक्षर हे मंगलच असतं. वनस्पती अनौषधी नसते, कोणताही माणूस अयोग्य नसतो, गरज असते ती ‘योजकाची’ म्हणजे मॅनेजमेंटची!
आता परवाच एक नवीन शोध लागलाय. ‘स्कूटॉइड’ नावाचा एक नवा आकार सापडला. मानवी शरीरातील पेशी या एकमेकांमध्ये कशा सुसंबद्धपणे गुंफलेल्या असतात हे सांगणारा हा स्थिरता देणारा आकार. यात एका बाजूला 5 आणि दुस-या 6 भुजा असतात. मला वाटून गेलं की एक बाजूला पंचमहाभुतं आणि दुसर्या बाजूला पंचेद्रिय अशा आकाराबरोबरच बाजूला पंचेद्रियांबरोबर ‘विवेकाची’ सहावी भुजा जर असेल तर तंत्रज्ञानाची मानवाबरोबरची ‘स्कूटॉइड’ यंत्रणा स्थिर होईल!
पावसचे स्वामी स्वरूपानंद संजीवनीगाथेत म्हणतात-अंतरी सद्भाव स्वागत जागृत, तरी यंत्रे हित स्वामी म्हणे!नवीन वर्षाचं स्वागत करताना हा सद्भाव आणि औद्योगिक क्रांती 4.0चंही 2019 मध्ये स्वागत करताना यात विवेकाची सहावी भुजा आपल्या सर्वांनाच मिळो ही शुभेच्छा देऊन या लेखमालेची सांगता करतो!
(लेखक आयटी तज्ज्ञ आहेत)