श्रीकृष्ण गजानन मंडळ,
कराड
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्सवाच्या नावानं नुस्ता धांगडधिंगा असं एक चित्र सर्रास दिसतं. मात्र कर्हाडचं श्रीकृष्ण गजानन मंडळ याला अपवाद आहे. स्थापनेपासूनच या मंडळानं आपलं वेगळेपण जपत हात कायम देता ठेवला आहे. १ जानेवारी १९७१ मध्ये डॉ. सुभाषराव देशपांडे व विनायक पावस्कर यांनी सोमवार पेठेत या मंडळाची स्थापना केली. त्या ८0च्या दशकातील गणेशोत्सवात आजच्या एवढा भव्यदिव्यपणा नव्हता; पण त्यावेळच्या सामाजिक गरजा ओळखून श्रीकृष्ण गजानन मंडळाने अनेक उपक्रम राबवले. गुलालविरहित गणेशोत्सव ही संकल्पना याच मंडळाने पुढे आणली. पारंपरिक पद्धतीनं मिरवणुकी काढूनही त्यात गुलाल उधळण्याला मात्र या मंडळानं कायम नकार दिला.
दरवर्षी मंडळाची मिरवणूक जोषात असते; पण चुकून कधी या मंडळाचे कार्यकर्ते गुलाल उधळताना दिसत नाहीत.
डॉल्बीचा दणदणाट तर अजिबात नाही आणि ‘डीजे’च्या तालावर थिरकणारे कार्यकर्ते दिसणारही नाहीत. हे असं इतकं शिस्तीचं काम असूनही या मंडळांची मिरवणूक दरवर्षी देखणी आणि लक्षवेधी ठरते. लोक मिरवणुकीतला त्यांचा गणपती पहायला गर्दी करतात. सध्या या मंडळाचे दीडशेहून अधिक नोंदणीकृत सभासद आहेत, तर शेकडो कार्यकर्ते आहेत. नोंदणीकृत सभासदांमध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त महिला आहेत. विशेष म्हणजे त्यांचाही आयोजनात मुख्य सहभाग असतो. पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक विषयावरील जिवंत देखावा या मंडळाकडून सादर केला जातो. विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, विद्यार्थी दत्तक योजना, क्रीडा स्पर्धा असे उपक्रमही हे मंडळ राबवतंच. या मंडळाला १९९६ पासून २00४ पर्यंत दरवर्षी ‘गणराया अवॉर्ड’ने पोलीस दलाकडून सन्मानित करण्यात आले आहे. २00४ नंतर मात्र इतर मंडळांना प्रेरणा मिळावी, त्यांनाही पुरस्कार मिळावेत, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून श्रीकृष्ण गजानन मंडळ स्वत:हून स्पर्धेतून बाजूला झाले. या मंडळाची गणपतीच्या काळातली शिस्त पहाण्यासारखीच असते.
- संजय पाटील
कर्हाड