अनेक कारणं सांगून बीट खाणं टाळण्यापेक्षा बीट खाऊन त्वचेचे आणि केसांचे अनेक प्रश्न सोडवणंहेच फायद्याचं! ताटात बीट पाहिलं की नाक मुरडून सरळ ते ताटाच्या बाजूला ठेवणारे अनेकजण असतात. आणि आरशात स्वत:कडे पाहताना चेहेऱ्यावर पुटकुळ्या वगैरे दिसल्या की जाम टेन्शन येतं यांना. खरंतर या टेन्शनचं उत्तर त्यांनी ताटातून बाजूला केलेल्या बीटातच असतं. आवडत नाही म्हणून बीट खाणं टाळण्यापेक्षा बीटाचे गुण जाणून त्याचा आहारात समावेश करणं हे सर्वांसाठीच फायद्याचं असतं. एकएक करून सांगायचं म्हटलं तर हाताची दहा बोटंही पुरणार नाहीत इतके गुण बीटात असतात. बीटामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह, ब१, ब२ आणि क जीवनसत्त्वं असतात. पोटॅशिअम, मँग्नीज, फॉस्फरस, सिलिकॉनसारखी खनिजं असतात.कमी कॅलरीज असलेल्या बीटात सहज पचवता येतील असे कार्बोहायडे्रटस असतात. आपल्या आहारात जर नियमित स्वरूपात बीट असेल तर रक्तातील हिमोग्लोबीन वाढतं. पेशींमधलं आॅक्सिजन वाढतं. बीटाच्या ज्यूसमधून शरीराला आवश्यक असलेलं नायटे्रट मिळ्तं. बीटात डी आणि अल्फा अमिनो अॅसिड असतं. शिवाय फ्लेवोनॉइड आणि कॅरेटोनॉइडससारखी अॅन्टिआॅक्सिडंटसही बीटामध्ये असल्यानं बीटाच्या सेवनानं शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. असं हे सर्वगुणसंपन्न बीट सौंदयौपचारातही महत्त्वाची भूमिका बजावतं. पुटकुळ्यांचा जाच आणि बीटाचं ज्यूसचेहऱ्यावर जेव्हा मोठ्या प्रमाणात पुटकुळ्या येतात, फोड येतात तेव्हा त्वचेचा असह्य दाह होतो. ही आग शमवण्याचा मोठा गुणधर्म बीटाच्या ज्यूसमध्ये असतो. बीटाचं ज्यूस करतांना त्यात काकडी आणि गाजर घातलं तर बीटाच्या ज्यूसची ताकद आणखी वाढते. बीटाचं ज्यूस रोज प्यायल्यास एकामागोमाग चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्यांना अटकाव होतो.केसांच्या ‘ क्वॉलिटी’ साठी बीटाचा उपयोगबीटामुळे रक्तप्रवाह सुधारतो. केसांची गळती कमी होते. केस वाढतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केसांची क्वॉलिटी सुधारते. बीटामधल्या सिलिका या खनिजामुळे केसांना चमकही येते. केसातल्या कोंड्यावर बीटाचं ‘सोल्यूशन’बीटामुळे केसातला कोंडा जातो. यासाठी एक बीट, दहा ते पंधरा कडीलिंबाची पानं आणि एक बूच अॅपल सायडर व्हिनेगार घ्यावं.बीट आणि कडीलिंबांची पानं एकत्र वाटून तो रस गाळून घ्यावा. आणि हा रस केसांना आणि केसांच्या मुळांना हलक्या हातानं मसाज करून लावावा. नंतर केस धुवावे. केस धुतांना एक मग पाण्यात एक बूच अॅपल सायडर व्हिनेगार घालावं. हे पाणी केसांवर टाकावं. आणि नंतर साध्या पाण्यानं केस धुवावेत. हा उपचार नियमित स्वरूपात केल्यास केसातला कोंडा जातो.मेहंदीचा रंग खुलवण्यासाठीकेसांसाठी मेहंदी भिजवतांना मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी त्यात चहा किंवा कॉफीचं पाणी टाकलं जातं. पण ते न टाकता बीट उकडलेलं पाणी टाकल्यास मेहंदीला रंग चढतो. मेहंदीमध्ये बीटाचं पाणी टाकल्यास मेहंदी लावल्यानं केसांना येणारा कोरडेपणाही टाळता येतो आणि केस सुंदर दिसतात.- डॉ. निर्मला शेट्टी
गुणाचं बीट!
By admin | Updated: March 24, 2017 16:03 IST