रात्रंदिवस कॅज्युअल्टी विभागात काम करणार्‍या तरुण इण्टर्न डॉक्टरांना काय दिसतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 01:59 PM2019-12-12T13:59:48+5:302019-12-12T14:00:19+5:30

सरकारी रुग्णालयात काम करणारे दोन तरुण इंटर्न एमबीबीएस डॉक्टर. रात्रंदिवस कॅज्युअल्टी विभागात काम करताना या दोन तरुण डॉक्टरांना असंख्य रुग्ण भेटतात. आणि ते सांगतात, कहाण्या आजारापलीकडच्या सामाजिक समस्यांच्या. ज्यात अर्थातच तरुण चेहरे आणि तरुणांचं वास्तव आजारांचं रूप घेऊन उभं असतं. ते चित्र कसं दिसतं हे सांगणारा हा विशेष लेख.

meet young interns who work in the Casualty Department In Hospitals. | रात्रंदिवस कॅज्युअल्टी विभागात काम करणार्‍या तरुण इण्टर्न डॉक्टरांना काय दिसतं?

रात्रंदिवस कॅज्युअल्टी विभागात काम करणार्‍या तरुण इण्टर्न डॉक्टरांना काय दिसतं?

googlenewsNext
ठळक मुद्दे आपल्या समाजाचं हे वास्तव पहावं लागेल, उत्तरंही शोधावी लागतील!

- श्रीनिवास पांपटवार, -स्मिता मोरे

शासकीय हॉस्पिटलात बारमाही, चोवीस तास सतत व्यस्त असणारी जागा म्हणजे कॅज्युअल्टी, म्हणजेच आपात्कालीन सेवा किंवा अपघात विभाग. सकाळी नवीन शिफ्टचे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि इतर स्टाफ रु जू होतात आणि त्यांची घडय़ाळाच्या काटय़ांसोबत स्पर्धा सुरू होते. कधी एका मागोमाग एक आणि कधी आपत्तीच्या वेळी एकदाच मोठय़ा संख्येने रुग्ण येतात. नाणं गिळणारी लहान मुलं, घामेजून छातीवर हात धरून येणार्‍या हृदयविकाराच्या रुग्णांपासून ते विष प्राशन करणारे शेतकरी अन् अपघातग्रस्त. अनेक प्रकारचे रुग्ण आणि 24 तास काम सुरू. याच कॅज्युअल्टीत इंटर्न (डॉक्टरांच्या उतरंडीतला सगळ्यात खालचा घटक) म्हणून  आम्ही काम करतो. तिथं काम करताना एक लक्षात आलं की आजारपणापलीकडेही इथं येणार्‍या रुग्णांच्या काही समस्या आहेत. सर्वसामान्य समाजाच्या म्हणजे मध्यम, निम्नमध्यम आणि निम्नवर्गाच्या समस्या काय आहेत, हे जाणून घ्यायचं असेल तर तिथल्या मोठय़ा शासकीय रुग्णालयाच्या कॅज्युअल्टीत येणार्‍या रु ग्णांच्या समस्या पहाव्यात. त्या समाजातल्या सामाजिक समस्यांचा एक मोठा ग्रंथच रुग्णांच्या वैद्यकीय समस्यांच्या पृष्ठामागे दडलेला असतो.
काय दिसतात त्या समस्या?

1.दारू
अपघात विभाग जसं नावातूनच सुचित होतं, कॅज्युअल्टील्या रुग्णांचा मोठा वाटा म्हणजे अपघातात सापडणारे लोक. यातले बहुसंख्य लोक जरी वरकरणी भळभळणार्‍या जखमा,  तुटलेले हातपाय, भाजलेली त्वचा घेऊन येत असले तरी त्यांच्या या त्नासाच्या मुळाशी असणारी गोष्ट म्हणजे दारू. सर्व अपघात दारूमुळेच होतात असं अजिबातच नाही; पण हे अपघातांचं महत्त्वाचं कारण आहे. कुणी कितीही नाकारलं तरी शनिवार-रविवारी, होळीच्या दिवशी, गटारी अमावास्येला, न्यू इयरला अपघाताच्या संख्येतली होणारी लक्षणीय वाढ हे अपघात आणि दारूचं घट्ट नातं स्पष्ट करते. कॅज्युअल्टीत जखमींना आणणारं दुसरं कारण म्हणजे हाणामार्‍या, हिंसाचार. ही प्रकरणंसुद्धा लोकांकडून बहुसंख्येने नशेत घडतात. दारूच्या किंवा इतर अंमली पदार्थाच्या प्रभावात विष प्राशन करणे, पूल वा घरांवरून उडय़ा मारणार्‍यांची संख्यापण बरीच असते. याशिवाय जे वर्षानुवर्षे दारू पीतात तेही अतिशय गंभीर तब्येत घेऊन कॅज्युअल्टीत दाखल होतात. ‘दारू’ ही किती महत्त्वाची सामाजिक समस्या हे प्रखरपणे कॅज्युअल्टीत जाणवतं. 

2. दुष्काळ आणि गरिबी
महाराष्ट्रात, विशेषतर्‍ विदर्भ आणि मराठवाडय़ात अनेक जिल्हे बरेच र्वष दुष्काळग्रस्त आहेत. मुळातच गरिबी असताना दुष्काळानं परिस्थिती अजून अवघड झालीये. कॅज्युअल्टीत काम करण्याआधी गरिबी आणि  दुष्काळामुळे कॅज्युअल्टीमध्ये इतके पेशंट येत असतील याची आम्हाला कल्पनाच नव्हती. शेती, त्यातल्या फवारण्या, त्यातून विषबाधा, हातचं पीक जाणं,   कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी विष प्राशन करतात. या चक्रात गरिबी अजून वाढते. खासगी क्षेत्नातली उपचारांची फी जास्त, पैसे संपेर्पयत रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल असतो आणि पैसे संपले की सरकारी आरोग्यव्यवस्थेशिवाय उपाय राहात नाही. कॅज्युअल्टीमध्ये काम केलेल्या सीनिअर्सकडून नेहमी ऐकायला मिळतं की कसं पैसे संपल्यावर, घर, दागिने आणि जमिनी विकून अथवा गहान ठेवून रु ग्णाचे खासगीत उपचार केले जातात.  शेवटी कंगाल होऊन तो शासकीय रु ग्णालयातच येतो. खरं तर दुष्काळ, गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा यासारखे अनेक सामाजिक प्रश्न एकमेकांशी घट्ट जुळलेले आहेत, त्याचा माणसांच्या आरोग्यावर परिणाम होतोच. आधीच गरीब असणार्‍या भारतीय समाजात दरवर्षी आरोग्यावर होणार्‍या खर्चामुळं 4 कोटी लोक दारिद्रय़रेषेखाली ढकलले जातात. आरोग्याचा अधिकार मिळविण्यासाठी आर्थिक दृष्टय़ा सधन असावं लागतं ही दुर्दैवी गोष्ट आहे.


3. अंधश्रद्धा आणि अज्ञान


भोंदूबाबांकडे जाण्याचं प्रमाण आजही जास्त आहे. त्यात अजूनही समाजात काही अंधश्रद्धा, रीतीभाती आहेतच. नवजात बालकांच्या तोंडात मध घालणे, कांजिण्या किंवा गोवर उठणार्‍या मुलांना डॉक्टरकडे न नेता मंदिरात नेणे वगैरे. यामुळं बर्‍्याचदा कॉम्प्लिकेशन होऊन रुग्ण कॅज्युअल्टीमध्ये येतो. या अंधश्रद्धांचं महत्त्वाचं कारण म्हणजे अपयशी शिक्षणव्यवस्था. अज्ञान. या अंधश्रद्धांना बळी पडून आजार वाढवून घेतलेले अनेक तरुणही दुर्दैवानं आम्हाला इथं भेटतात.

4.  सामाजिक तेढ आणि हिंसाचार


कौटुंबिक, जातीय, धार्मिक आणि राजकीय कलहातून अनेकदा हिंसाचार होतो. अपघात आणि हिंसाचाराच्या घटनांचा न्यायवैद्यक नोंदणी ( पोलीस केस) शी संबंध असल्याने खासगी 
रु ग्णालयं  पेशंट सहसा स्वीकारत नाहीत. मग ते रुग्ण सरकारी दवाखान्यात येतात. हाणामारी करून येणारे अनेकजण भेटतात, तेव्हा सामाजिक सलोख्याची गरज पुनर्‍ पुन्हा जाणवते.


5. महिलांचे प्रश्न


समाजाच्या घडणीत मोठा वाटा असतो तो महिलांचा. त्यांच्या समस्यांचा विशेष विचार होणं आरोग्याच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. सतत कामात अडकून असणार्‍या आणि आहार नवरा-मुलांपेक्षा खूप कमी घेणार्‍या अनेक महिला कुपोषणास बळी पडतात. संततीच्या आरोग्यावर परिणाम होतो. स्री-पुरु ष भेदाचीही आरोग्यव्यवस्थेला नित्य सवय झालेली आहे. शासकीय रुग्णालयांच्या प्रसूतिगृहाबाहेर मुलगी झाली म्हणून नाराज असणारे चेहरे इथं नेहमी दिसतात. हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, मारझोड तर नेहमीचीच. स्रियांची/तरुण मुलींची भयाण अवस्था इथं दिसते.

6. समस्याच समस्या आणि ‘सामाजिक डॉक्टरांचा’ अभाव


आधी वाचलेला समस्यांचा हा पाढा केवळ आम्हाला जाणवलेल्या समस्या आहेत. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात काम करणार्‍या इंटर्नला त्या त्या ठिकाणच्या सामाजिक परिस्थितीनुसार समस्या दिसत असाव्यात.  दुष्काळी बीडमधल्या ऊसतोड कामगार महिलांची गर्भाशयं काढली जाणे, पर्यायी जलस्रोताअभावी गावंच्या गावं फ्लुरॉसीसने प्रभावित होणे, बाबाभगतांच्या भोंदूगिरीत कोकण-मेळघाटात सर्प/विंचू दंशाने जीव जाणे अशी अनेक जीवंत उदाहरणं आहेत. याप्रमाणेच मुंबईतली झोपडपट्टीची समस्या, गडचिरोली-मेळघाटातील दुर्लक्षित आदिवासींच्या समस्या, विकसित समजल्या जाणार्‍या शहरांतली प्रदूषणाची समस्या या आपापले विशिष्ट आजार घेऊन फक्त व्यक्तीचं नाही, तर समाजाचं, देशाचं सर्वागीण आरोग्य बिघडवतात. अशा समस्यांमुळे होणारे आजार बरे करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर पडली आहे. पण या समाजाचे सर्वागीण आरोग्य सुधारण्यासाठी या सामाजिक समस्या-प्रश्न सोडविण्यासाठी अभियंते, शिक्षणतज्ज्ञ, जलसंधारण कार्यकर्ते, ग्रामविकास कार्यकर्ते, पर्यावरणतज्ज्ञ, वकील आणि सार्‍याच क्षेत्नातल्या तज्ज्ञांना समाजाचा डॉक्टर बनावं लागेल. आपल्या समाजाचं हे वास्तव पहावं लागेल, उत्तरंही शोधावी लागतील!

- श्रीनिवास पांपटवार, निर्माण 8 
(एमबीबीएस, सध्या इंटर्नशिप डॉ. शंकरराव चव्हाण शा. वै. महाविद्यालय, नांदेड)
-स्मिता मोरे, निर्माण 7 
(एमबीबीएस आणि सध्या इंटर्नशिप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद)

Web Title: meet young interns who work in the Casualty Department In Hospitals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.