शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मणिपूरचा मुंबईकर डॅनियल

By अोंकार करंबेळकर | Updated: March 22, 2018 15:38 IST

तो प्रेमात पडला, तिला मागणी घालायला तिच्या गावी, मणिपूरला तमिंगलॉँगला पोहचला.. आणि मग तिथल्या प्राण्यांच्या प्रेमात पडून तिथंच त्यानं एक नवीन काम उभारलं..

डॅनियल मकवान. मुंबईच्या जिजामाता उद्यानात जाऊन प्राण्यांचं निरीक्षण करायचं हा त्याचा आवडता उद्योग. बी.ए.ची पदवी मिळवल्यावर डॅनियलसाहेब गॅलिना नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले आणि तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी थेट तिच्या गावात मणिपुरात तमिंगलाँग गावी पोहचले. डॅनियल लग्नाची मागणी घालायला तिकडे गेला खरा; पण तिकडे गेल्यावर त्याला दिसला एक धक्कादायक प्रकार. हा प्रकार बघितला आणि तो तिथंच थांबला. आज त्याची पत्नी गॅलिना आणि तो तमिंगलाँगमध्ये वन्यप्राण्यांसाठी काम करतात.मणिपूरची राजधानी इम्फाळपासून तमिंगलाँग १६० किमी अंतरावर आहे. एकदम हिरवंगार आणि दाट झाडीने वेढलेलं. त्याच्याजवळच १० किमी अंतरावरच्या एका १३५ चौरस किलोमीटर अंतराच्या जंगलाला बायोडायव्हर्सिटी हेरिटेज एरिआ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जगातील अत्यंत दुर्मीळ प्राणी, पक्षी आणि वनस्पती, कीटक या जंगलामध्ये आढळतात. तमिंगलाँगमध्ये गॅलिनाबरोबर फिरताना त्याला एकेदिवशी रस्त्यावरच प्राणी आणि पक्षी मांडलेले दिसले. त्यामध्ये जंगलातून पकडून आणलेली खवल्या मांजरंही होती. रानमांजरं, खवल्या मांजरं, कासवं अशी भाजी मांडल्यासारखी पाहिल्यावर डॅनियलच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली. हे काही साधेसुधे प्राणी नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं तडक घरी येऊन कॉम्प्युटर उघडला आणि माहिती तपासली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं हे प्राणी संरक्षित यादीतले होते आणि त्यांची विक्री किंवा शिकार करणं बेकायदेशीर आहे. डॅनियलने या प्राण्यांबाबत चौकशी सुरू केली. खवल्या मांजरासारखे प्राणी म्यानमारमार्गे चीनमध्ये जातात असे लोकांनी त्याला सांगितलं. ईशान्य भारतामध्ये त्याचा औषधांसाठीही वापर होतो. वाघाची हाडं, खवल्या मांजराचे खवले, रानमांजराचं, अजगराचं, माकडाचं मांस आणि हाडं औषधांसाठी वापरले जातात. तो म्हणतो इकडे होणाऱ्या शिकारीच्या परिणामांचा अजून योग्य अभ्यास केलेला नाही अन्यथा इथल्या वन्यजीवांची घसरलेली संख्या नीट समजेल. वाघ, मगरी, कोल्हे, अस्वलं, क्लाउडेड लेपर्ड यांच्यासारखे असंख्य प्राणी आणि पक्षी तमिंंगलाँगच्या आसपासच्या प्रदेशातून नष्ट झाले आहेत असे तो सांगतो.ही सगळी माहिती अत्यंत धक्कादायक होती. डॅनियलने मग तिथं राहूनच काम करायचं ठरवलं. खवल्या मांजरं, कासवं, रानमांजरांची शिकार करू नका हे स्थानिकांना पटवून देणंच तसं अवघड; पण डॅनियलने हे काम हातात घेतलं. जाळ्यात सापडलेले पक्षी, जखमी प्राणी, पिंजºयातले प्राणी त्यानं विकत घ्यायला सुरुवात केली, त्यांच्यावर उपचार करून पुन्हा जंगलात सोडायचं काम त्यानं सुरू केलं. मणिपूरमध्ये प्राण्यांचे डॉक्टर फारसे नसल्यामुळे त्यानं महाराष्ट्रातल्या आपल्या मित्रांची मदत घेतली. एखादा जखमी प्राणी आणला की मग त्याच्यावर कसे उपचार करायचे, त्याला काय खायला द्यायचं, कधी खायला द्यायचं हे सगळं फोनवर तो समजून घेऊ लागला. एकदा त्यानं रानमांजराचं पिलू १००० रुपयांना विकत घेतलं. आईपासून ताटातूट झालेल्या त्या चिमुकल्या पिलाला काही तासांच्या अंतरानं दूध पाजण्याचा प्रयत्न केला; पण ते फार वेळ जगलं नाही.

शिकार करणं बेकायदेशीर आहे, लोकांच्या गळी उतरणं शक्य नव्हतं. कारण या भागात उत्पन्नाची साधनं फारशी नव्हती. त्यात एखाद्या समूहाला तुमचा सध्याचा व्यवसाय करू नका, असं सांगताना त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध करून देणं आवश्यक नसतं. डॅनियलच्या हातामध्ये या लोकांना शिकारीसाठी पर्याय देण्यासाठी काहीच नव्हतं. मग त्यानं लहान मुलं, शिकारी लोक, महिला यांना शिकारीमुळे निसर्गाचं होणारं नुकसान समजावून द्यायला सुरुवात केली. तमिंगलॉँग अ‍ॅनिमल्स होम नावाची संस्था स्थापन केली. त्याची पत्नी गॅलिनाचे वडील तेथे शिक्षणाधिकारी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला समाजामध्ये विशेष आदराची वागणूक मिळते. त्यामुळे त्यांच्या ओळखीचा फायदा झाला. गॅलिनाला तेथील स्थानिक भाषा येत असल्यामुळे विशेषत: महिलांशी बोलणं सोपं झालं. आता त्यांच्या संस्थेने १५ एकरांची जागा विकत घेतली आहे या जागेवर ते पशुपक्षी संवर्धन, उपचाराचं काम सुरू करत आहेत. डॅनियल म्हणतो, प्रत्येकवेळेस विकायला आलेला प्राणी विकत घेणं आम्हालाही शक्य होत नाही. ज्यावेळेस शक्य असतं तेव्हा आम्ही प्राणी-पक्षी विकत घेतो, त्यांची शुश्रूषा करतो. पण पैसे पुरत नाही. त्यात या भागात पशुवैद्यक नसल्यामुळेही आमची चांगलीच अडचण होते. अशा अडथळ्यांवर मात करतच आमचं काम चालू आहे.या परिसरामध्ये इको-टुरिझमसारखा व्यवसाय लोकांनी हाती घेतला तर त्यांना पर्यायी रोजगार मिळू शकेल असं डॅनियलच मत आहे. लोकांना पोट भरण्यासाठी सरकारने पर्याय दिला नाही तर ते अन्नाच्या शोधात साहजिकच जंगलाच्या वाटा धुंडाळतील. मग त्यांना रोखण्यासाठी आपल्याकडे काहीतरी ठोस कार्यक्रम असला पाहिजे. डॅनियलने सरकारचे दरवाजे मदतीसाठी ठोठावले आहेत; पण त्याच्या हातामध्ये फारसं काही आलेलं नाही. म्यानमारमार्गे चीनला जाणारे प्राणी तसेच शिकार पोहचवण्याच्या वाटा बंद झाल्या पाहिजेत, सरकारने त्यासाठी तातडीने पावलं उचलायला हवीत असं त्याचं म्हणणं आहे. स्थानिक महिलांनी मात्र बुशमिट विकायला नकार दिला असून, त्यांनी बुशमिट विकणं बंद केलंय. डॅनियलचं काम पाहायला आजूबाजूच्या गावांमधून मुलं येतात, त्या सगळ्या मुलांना डॅनियल आणि गॅलिना भरपूर माहिती देतात. प्राण्यांची ओळख झाल्यावर ही मुलं वन्यजीवप्रेमी होऊनच त्याच्या संस्थेतून बाहेर पडतात. onkark2@gmail.com