- श्रेणीक नरदे
कोरोनामुळे अख्खा भारत लॉकडाऊन झाला. उद्योगधंदे थांबले, ऑफिसं थांबली, शाळा-कॉलेजनी सुटय़ा दिल्या. शहरातील लोक गावी परतले, गावची पोरं घरची घरी राहिली. आणि एकदम ग्रामीण भागात मनुष्यबळ भरभक्कम झालं. गेल्या महिन्याभरात शेती, बागकामाशी संबंधित वेबसाइट, यू-टय़ूब चॅनल यांच्या प्रेक्षकांत भरपूर वाढ झाल्याचं दिसतं. माणसांनी केलेला पहिलावहिला व्यवसाय म्हणजे शेती. शेतीनेच माणसाची भटकंती थांबवली आणि त्याला स्थिरस्थावर होण्यास भाग पाडलं. या लॉकडाऊनच्या काळातही अनेकांनी हौशी बागकाम केलं. शेतीतली कामं तर जोरदार सुरू आहेत. त्याच्याशी संबंधित माहिती देणारे वेबपोर्टल, वृत्तपत्रं, यू-टय़ूब चॅनल आदी ठिकाणी पडणा:या उडय़ा या साक्षर लोकांच्या आहेत. यातून वेगवेगळे प्रयोग करण्याकडे एकूण तरुणांचा कल वाढलेला दिसतोय. शेताच्या बांधाला फळझाडं लावण्यापासून, शहरांत किचन गार्डन करण्यापासून, ते प्रत्यक्ष शेतात काम करणा:यांची संख्या आज वाढलीय.शेतातलं काम हे एक क्रिएटिव्ह काम असतं, बिया रुजवणं, त्यांचं अंकुरणं, त्याचं रोपटं होणं, फुलं सुटणं, आणि त्या झाडाला निरोगी फळं येणं हे बघण्यापेक्षा करण्यात मोठ्ठा आनंद असतो. मात्र कामाच्या धावपळीत म्हणा, शाळे-कॉलेजच्या अभ्यासात म्हणा आपण इतके गुंतून गेलेलो असतो की, सहजच एखादी बी पडून ती रुजून फुटून अंकुरलेली बघण्याचंही आपल्याला भान नसतं. आता आली टाळेबंदी. सगळं ठप्पं. घरात बसून बसून बसणार तर किती? सातत्याने मोबाइलवर व्यस्त राहणा:यांनाही दोन-चार महिन्यांनी याचा कंटाळा आलाच. त्यामुळे मग गावी आलेले, शिकलेले, नोकरीवाले तरणोही शेताकडे जाऊ लागले.पूर्वी म्हणलं जायचं, म्हातारी झाली तरी सासू स्वयंपाकघर सोडत नाही, तसंच इकडे पोराचा बापही शेती पोराकडे सोपवायला तयार नसतो. यात त्यांची चूक आहे असं नाही, शिकलीसवरली पोरं ही हुकतात त्यामुळे बापाला काळजी वाटते की हा काय शेतात राबणार?आता हे पहा त्याचं झालं असं, मिरचीचं शेत होतं, त्यावर मुट:या आलता, मुट:या म्हणजे पानं गोळा व्हायला लागतात आणि प्रकाशसंशलेन व्यवस्थित न झाल्यानं झाडांची वाढ खुंटते, तर लॉकडाऊनच्या काळात हौशी पोरगं बापाला म्हटलं मी स्प्रे घेतो. यानं चांगला चार्जिंग पंप अडकवला आणि त्यात औषध कालवलंतं तणनाशकाचं, गडी मस्त नाइट पँट-टी-शर्ट कानात ब्लू टूथ हेडफोन घालून लागला फवारायला, कौतुकानं बापही बांधावर बसून बघू लागला, एवढय़ात टाकी संपली परत औषध भरायला आला. बापानं बघितलं पोरगं तणनाशक कालवतंय. झालं खाल्या शिव्या. तर हे असं होतं. पण सगळेच काही बिनसुद्धीचे नसतात. पण बाप लोकं अडवतात त्यावेळी अशीही काही कारणं असतात.पण पोरांना बापाचे कष्ट पाहवत नाही. चल मी येतो म्हणत ते कामाला लागतात. आता पावसाळा. शेतात नव्या लावणीची, पेरणीची लगबग सुरू आहे. यंदा यात मुलांची फार मदत होतीय. विशेष म्हणजे काही पालक आपल्या तरुण मुलामुलींच्या पद्धतीने नवी शेती करताहेत.