LOOK @ You! Style Statement at the Cannes Festival? | LOOK @ You! - कान महोत्सवात नेमकं काय होतं स्टाइल स्टेटमेण्ट?
LOOK @ You! - कान महोत्सवात नेमकं काय होतं स्टाइल स्टेटमेण्ट?

ठळक मुद्दे‘अटेन्शन टू द डिटेल’ या तत्त्वानं आता आपल्या लूकचा निर्णय घेतला जातो. त्यातून आपलं स्टाइल स्टेटमेण्ट घडतं आणि व्यक्तिमत्त्व, आपली इमेज हे आकाराला येतं, हे सेलिब्रिटींच्याच नाही तर सगळ्यांच्याच बाबतीत खरं आहे!

- प्राची खाडे

फॅशनच्या संदर्भात विचार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर फॅशन बदलत गेली, उत्क्रांत होत गेली. गेल्या अनेक वर्षात फॅशन फक्त दिसणं, नटणंमुरडणं यापुरती उरली नाही, तर ती व्यक्तिगत पातळीवर उत्क्रांत होत एका नव्या रुपाला पोहोचली आहे. आणि आता तर नव्या सोशल मीडियाच्या काळात फॅशनचे अर्थ, त्यातून मांडायचं आपलं व्यक्तिमत्त्व, आपल्याला अभिप्रेत संदेश हे सारंच बदललं आहे.
हे जरा समजायला अवघड आहे असं वाटलं तरी ते तसं नाही. फॅशन बहुआयामी आहे, याचंच हे एक रूप आहे. सोशल मीडियामुळे फॅशन आणि तिचा परिणाम, त्यानं होणारे बदल हे व्यक्तिगत पातळीवर आणून ठेवले आहेत, कारण सोशल मीडिया  व्यक्तिगत संवादही साधू शकतो, त्याचा परिणाम व्यक्त होण्यावर होतो. व्यक्त होण्यात फॅशनही अभिप्रेत आहेच. 
कानसारख्या महोत्सवात रेड कार्पेटवर उतरणार्‍या तारकांच्या कपडय़ांची, मेकअप आणि फॅशनची जी चर्चा होते ती फॅशनपुरती मर्यादित असली तरी प्रत्यक्षात ते चित्र तसं नाही. बदलत्या काळात त्याचीही सारी परिमाणंच बदलली आहेत. 
पूर्वी काय व्हायचं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महोत्सवात जायचं असेल तर तिथल्या वातावरणाचा विचार व्हायचा. अ‍ॅम्बियन्स-माहौल काय आहे? कोण कोण गेस्ट आहेत? थिम काय आहे? या सगळ्या सरसकट जेनेरिक माहितीच्या आधारावर काय घालायचं याचा विचार केला जायचा. त्यानुसार आपले सेलिब्रिटीही स्वतर्‍ला सादर करायचे. आता मात्र बदलत्या काळात सेलिब्रिटी, टीव्ही कलाकार, सिनेमातले कलाकार हे सारेही फॅशनच्या बाबतीत इव्हॉल्व होत गेले आहेत. पूर्वी या तारकांच्या फॅशनचं तरुण पिढी अनुकरण करायची. सिनेमातल्या फॅशन लोकप्रिय व्हायच्या. मात्र त्यांचं फॉलोइंगही काहीअंशी देशापुरतं मर्यादित होतं. आता सोशल मीडियावर त्यांचं फॅन फॉलोइंग जगभर असतं. जगात कुठंही असलेला माणूस सोशल मीडियावर कनेक्ट होऊ शकतो, संवाद साधू शकतो. व्यक्तिगत पातळीवर हा संवाद होतो, पर्सनल कनेक्शन तयार होतं. त्यात हे सेलिब्रिटीही आपले रोजच्या जगण्यातले फोटो सोशल मीडियात पोस्ट करतात. बाहेर जेवायला जातानाचे, जिमला जातानाचे, बागेतले, सुटीला गेल्यावरचे, घरात वावरतानाचे फोटोही ते आपल्या सोशल मीडिया अकाउण्टवर टाकतात. हे सारे करताना ते केवळ एका इव्हेंटचा नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, आपल्या इमेजचा, आपल्या स्टाइल स्टेटमेण्टचाही विचार करतात. त्यातून ते स्वतर्‍चं एक स्टाइल स्टेटमेण्ट तयार करत असतात. त्यांना फॉलो करणार्‍यांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज असतो आणि त्यांच्या स्टाइल स्टेटमेण्टचाही.
हे सेलिब्रिटी जेव्हा रेड कार्पेटवर जातात तेव्हा ते आपलं व्यक्तिमत्त्व सोबत घेऊन जातात. त्यांच्या ‘पर्सनॅलिटी’प्रमाणे डिझायनर मग त्यांच्या कपडय़ांचा विचार करतात. त्यांच्या व्यक्तित्वाला शोभेल किंवा अधिक ठळकपणे मांडेल असे कपडेच मग रेड कार्पेटवर घातले जातात. सरसकट काहीही घातलं असं आता होत नाही. कारण हे सेलिब्रिटी स्वतर्‍चं, आपल्या स्टाइल स्टेटमेण्टचं आणि आपल्या इंडस्ट्रीसह देशाचंही प्रतिनिधित्व करत असतात.
एक उदाहरण सांगते, विद्या बालन. तिची स्टाइल पूर्वी खूप वेगळी होती. पुढे सब्यसाची मुखर्जीने साडी खास तिच्यासाठी डिझाइन केल्या. आणि त्यानंतर साडय़ा ती सर्रास नेसू लागली. त्याआधी साडी हे काही स्टाइल स्टेटमेण्ट नव्हतं. मात्र बाईपण, सेन्शुअस असणं, तरीही पारंपरिक आणि डिसेंट असं विद्याचं आणि साडीचं स्टाइल स्टेटमेण्ट तयार झालं. तेच तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेलं. अत्यंत ग्रेसफुल असा तिचा साडीतला वावर असतो. विद्याच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेशा साडय़ा मग तयार झाल्या, त्या तिनं वापरल्या.
दीपिका पदुकोण, अनुष्का शर्माही साडय़ा वापरतात. मात्र त्यांचं स्टाइल स्टेटमेण्ट वेगळं आहे. दीपिका लो नेक गळा, वेस्ट लाइन दिसणार्‍या साडय़ा नेसते. तिच्यासाठी डिझाइन केलेल्या साडय़ा वेगळ्या असतात. 
अशा रीतीनं सेलिब्रिटींचीपण पर्सनल स्टाइल घडत असते. आणि ही स्टाइलही अत्यंत ‘पर्सनल’ होताना दिसते. आणि मग जेव्हा हे कलाकार आंतरराष्ट्रीय सोहळ्यांत जातात तिथं त्यांना सोशल मीडियात जगभरातले लोक फॉलो करतात. त्यामुळे आता सर्रास काहीही न घालता आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ठळक करतील, अधिक चांगल्या प्रकारे आपलं स्टाइल स्टेटमेण्ट मांडतील असे पोषाख आणि मेकअप हे कलाकारही परिधान करतात.
सोनम कपूरचं उदाहरण घ्या. ती फॅशनिस्टा आहे. ती आताशा अनेक इव्हेंट्सना अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही साडी नेसते. कॉटनची, पेस्टल शेडची साडी सर्रास वापरते. त्यात तिचं इंडिया स्टेटमेण्ट तर असतंच. मात्र ‘यंग’ लूकचंही स्टेटमेण्ट असतं. पारंपरिक पद्धतीनं साडी न नेसता ती पॅण्टवर, स्कर्टसह, टॉपबरोबर साडी नसते. अगदी कान महोत्सवातही तिनं गुलाबी साडी, पॅण्ट आणि जॅकेटसह नेसली होती. आपलं फॅशनिस्टा असणं, आपली पर्सनल स्टाइल, आपलं भारतीयत्व आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची आपली ओळख हे सारं तिनं एकत्र छान गुंफलं. तिच्या रेड कार्पेट ड्रेससह हे सारं येतंच.
मुद्दा काय तर, फॅशन ही आता सरसकट, जेनेरिक राहिलेली नाही, तर ती ‘पर्सनलाइज्ड’ झाली आहे. जे कपडे आपण घालतो तो आपला अ‍ॅटिटय़ूड आहे. ती आपली पर्सनॅलिटी आहे असं म्हणून स्वतर्‍ला रेड कार्पेटवर पेश केलं जातं.
आता हे सूत्र तुम्ही दीपिका, कंगणा, हीना खान, प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या राय यांच्या कान महोत्सवात सादर झालेल्या पोशाख आणि मेकअपला लावून बघा. त्यांचं व्यक्तिमत्त्व, अ‍ॅटिटय़ूड आणि पर्सनल स्टाइल त्यात दिसेल. कारण फॅशनचं जग आता अत्यंत पर्सनल होत आहे..

***
 

मेकअप डिझायनर.

ड्रेस डिझायनरइतका आता महत्त्वाचा असतो मेकअप डिझायनर. मेकअप आर्टिस्ट. हेअर स्टायलिस्टही. आताशा तरुण मुलं-मुलीही हेअर ग्रुमिंग, सेल्फ ग्रुमिंगचा इतका विचार करतात. आपल्या हेअर स्टाइलवर प्रयोग करतात. त्यातून आपला अ‍ॅटिटय़ूड मांडतात. 
तरुण मुलगे तर दाढी ठेवतात, काढतात, ट्रिम करतात, केसांचा रंग बदलतात. प्रयोग हे तारुण्यातल्या स्टाइलचा भाग असतात.
चांगलं दिसायचं असेल तर उत्तम मेकअप हवा, केसांची रचना हवी, ड्रेसेस चांगले हवेत, फोटोग्राफर हवा हे सारं आजकाल सोशल मीडियात फॅशन फॉलो करणार्‍या सर्वाना कळतं. तसं ते प्रत्यक्षातही करतात.
ही ‘लूक अ‍ॅट यू’ अशी स्वतर्‍कडे पाहण्याची, चांगलं दिसण्याची ओढ सामान्य माणसांना आहे. तशीच सेलिब्रिटींतही आहेच.  
त्यामुळे हा नवीन काळ आहे तो आहे. ‘अटेन्शन टू द डिटेल इन फॅशन!’ म्हणजेच प्रत्येक लहानसहान तपशीलाचा विचार करून आपल्या लूकचा निर्णय घेतला जातो. त्यातून मग आपलं स्टाइल स्टेटमेण्ट घडतं आणि व्यक्तिमत्त्व, आपली इमेज हेही आकाराला येतं.
जे सामान्य लोक करतात तेच सेलिब्रिटी रेड कार्पेट, विविध इव्हेंट यासंदर्भातही करतात. त्यामुळे मेकअप आणि केसरचना यांचेही संदर्भ आता बदलले आहेत, अधिक पर्सनलाइज्ड झाले आहेत.

***
फॅशन नव्हे पर्सनॅलिटी

 कोण काय घालतं, ट्रेण्ड काय, रंग कोणते चर्चेत याचा विचार करून कपडे आता घातले जात नाहीत. तर आपली शरीरयष्टी, व्यक्तिमत्त्व यांना शोभेल असेच कपडे आता वापरले जातात. पूर्वी कानला जाताना कुणाला भारताचं प्रतिनिधित्व अधोरेखित करायचं असेल तर सर्रास सिल्कची साडी नेसून जाणं व्हायचं. आता तसं करता, आपलं व्यक्तिमत्त्व, अ‍ॅटिटय़ूड, आंतरराष्ट्रीय स्तरावर करायचं स्टेटमेण्ट आणि फॅशन याचा मेळ घालून लूक डिझाइन केले जातात. 


(लेखिका स्टायलिस्ट आहेत.)
शब्दांकन- ऑक्सिजन टीम 


Web Title: LOOK @ You! Style Statement at the Cannes Festival?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.