शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Killing टाइम !- ही सवय आपला कचरा करते आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 8:00 AM

एखादी लिंक, एखादा व्हिडिओ, एखादी चर्चा, एखादी माहिती, कुणाचं एखादं स्टेट्स अपडेट मिस झालं, तर आपल्या आयुष्यात फार मोठं नुकसान झालंय, असं आपल्याला का वाटतं?

-प्राची पाठक

 

इंटरनेटच्या पसाऱ्यात समजा १० सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत. आणखीन काही ॲप्स आहेत. त्यातल्या प्रत्येक ॲपवर आणि प्रत्येक साईटवर आपण असलंच पाहिजे का? असा प्रश्न आता आपल्याला पडतो का? कोणी म्हणतं, अमुक साईट्सवर मस्तं व्हिज्युअल्स आणि व्हिडिओज् आहेत. कुठे खूप मित्रमंडळी आहेत. कुठे ग्रुप बनवून धडाधड मेसेजेस् पाठवणं सोपं असतं. कुठे नोकऱ्या-बिझनेस असतो. म्हणून तिथे आपण असतो. ह्या सगळ्या गदारोळात प्रत्येक सोशल मीडिया ॲप आणि साईटवर दिवसातले दहा मिनिटं खर्च करायचे म्हटलं तरी प्रत्येक ठिकाणी डोकावत बसायला दीड-दोन तास तर असेच निघून जातील. बरं, कनेक्टेड राहा, अपडेटेड राहा, म्हणजे किती वेळ कनेक्टड रहायचं, अपडेट्स शोषून घ्यायची स्पर्धा सुरू आहे? त्याला काही लिमिट असायला हवं की नको. ह्या साईट्सवरून फार चांगल्या गोष्टी कळतात, असं मानू क्षणभर. पण, म्हणजे जगातलं सगळं चांगलं, सगळं भारी वगैरे आपल्याला कोळून प्यायचं आहे! तेही केलं, तर पुढे काय? त्याचा आपल्याला फायदा काय?

एखादी लिंक, एखादा व्हिडिओ, एखादी चर्चा, एखादी माहिती, कुणाचं एखादं स्टेट्स अपडेट मिस झालं, तर आपल्या आयुष्यात फार मोठं नुकसान झालंय, असं आपल्याला का वाटतं? आपण एकटे पडू, मागे पडू, अशी भावना का व्हावी? बरं, रोजच्या रोज आणि तासंतास चांगल्या माहितीचा आणि चांगल्या लोकांच्या विचारांचा आपल्यावर भडिमार झाला, तरी आपल्या आयुष्यात त्यानं नेमकं काय होणार आहे? सगळ्यांचे सगळे अपडेट्स ठेवण्यात आपला वेळ जाणार आहे, की हे बिनकामाचे अपडेट्स बसल्या जागी स्वतः काहीही न करता पाहत आपण नकळत चिंता, स्ट्रेस, स्वतःविषयीचा कमीपणा, शारीरिक समस्या याला सामोरे जाणार आहोत? कधी विचार करणार या सगळ्याचा? एखादी पार्टी जर तुम्ही प्रत्यक्ष घरी द्यायची ठरवली, तर तुम्हाला चार गोष्टी प्लॅन कराव्या लागतील. काही सामान घ्यायला घरातून बाहेर पडावं लागेल. घरी आलेल्या लोकांना प्रत्यक्ष भेटावं लागेल. दीर्घकाळ मनात राहतील, अशा आठवणी तयार होतील.

पण, तुम्ही कोणाचे एकदम भारी डिनर पार्टीचे स्टेट्स अपडेट अगदी फोटो झूम करून-करून बघितले समजा. तुम्हाला क्षणभर मजा वाटली. नंतर मनात आणखीन काय काय सुरू होतं. तेव्हा मात्र ती मजा अगदीच निघून गेलेली असते.

याचं सगळं कसं भारी.

आपल्याला का नसेल बोलावलं?

त्यांना बरं परवडतं.

त्यांचे घरचे भारीच आहेत. आपल्या घरचे असे का नाहीत?

ते लोक दिसायला मस्तंच आहेत. मी जरा कमीच त्याही बाबत!

असं करत करत ही यादी खूपच अनाकलनीय विचारांनी भरून गेलेली असते. म्हणजे कोणाचे अपडेट आपण समजा पाच मिनिटांत पाहिले, तर त्यावर नंतर आपल्या मनात जे काही सुरू राहतं, ते बराच काळ सुरू असतं. दुसऱ्याच्या आनंदात सदैव कमालीचा आनंद वाटून घेणारे आपण संत - महात्मे तर नसतोच. त्यामुळे, नकळत तुलना सुरू होते. आपण जे काम करीत असतो, ते सोडून देऊन, आपला वेळ घालवून हे सगळं मनातलं चक्र बसल्याजागी ओढवून घेत असतो. जे काम सहजच मजा म्हणून केलेलं असतं, त्यात शेवटी आपल्याला काय फिलिंग मिळते, की आपण कुठेतरी कमी आहोत. आपलं असं काही भारी नाही. म्हणजे आपला नेटपॅक खर्चून, आपला हातातला सोन्यासारखा वेळ घालवून जगातल्या कोणा-कोणाबद्दल आपण उगाचच अपडेट्स ठेवत बसलेलो असतो. त्याने आपल्या आयुष्यात चार गोष्टी मार्गी लागणार असत्या, तर गोष्ट वेगळी. पण, केवळ घालविण्यासारखा वेळ हाताशी आहे, म्हणून दुसऱ्यांच्या खिडकीत किती डोकावत बसायचं? अगदी कोणी कितीही खिडक्या उघड्या ठेवल्या तरी आपल्याला आपलं असं काही काम - आवडी - करिअरचे मार्ग असतात की नाही ज्यावर आपण वेळ देऊ शकू?

आपल्या मनात आपल्याला पाहणारं कोणीही नसल्यानं तिथं जे काही विचारचक्र सुरू असतं, त्याचे साक्षीदार केवळ आपणच असतो. आपणच आपल्याला ताळ्यावर ठेवायचं स्किल चटकन शिकता येईलच असं नाही. म्हणूनच सोशल नेटवर्किंग साईट्सवर किती ठिकाणी आपण आहोत, तिथे किती वेळ दिवसातून घालवत आहोत, याचा चेक ठेवणं ही पहिली पायरी असते. ती आपल्याला आपल्या शरीर-मनाच्या आरोग्यासाठी चढावीच लागते. त्यातच वेळ कसा निघून गेला, याची उत्तरं असतात. मुख्य म्हणजे इतका वेळ देऊन आपल्या पदरात पडलं काय, हे तर विचारावंच स्वतःला!

--------------------------------------------------------------------------------------------------

 

मनातला सायबर कचरा

स्टेट्स अपडेट्स पाहत बसताना, इतरांच्या चर्चा वाचत बसताना मात्र आपल्याला काहीच करायचं नसतं. एका जागी निष्क्रिय बसून तुम्ही, तुमचा फोन आणि तुमचं मन ह्यात खेळायचं असतं. एकाच पोझिशनमध्ये सातत्यानं बसून, सातत्यानं फोन धरून शरीरावर येणारा ताण ही तर वेगळीच गोष्ट. म्हणजे, इतकं करून, इतका वेळ देऊन मनात कचरा भरून घ्यायचा. तो गेलेला वेळ जितका अधिक, तितकं मनाला ती सगळी माहिती शोषून घेऊन त्यावर प्रोसेस करत बसणं अवघड. तितकं शरीरालादेखील त्रासदायक. सोशल मीडियावर माहितीचा भडिमार आहे. इतके अपडेट्स आहेत की आपण ते सगळंच्या सगळं कितीही वेळ घालवून शोषून घ्यायचं म्हटलं तरी तो गेलेला वेळ, त्यात घेतलेली मजा नंतर आपल्या आठवणीत राहील असं नाही. कारण त्या वेळी मन मात्र तुलना, असूया, चिंता, ताण वगैरेच्या मोडवर सुसाट सुटलेलं असतं! मुख्य म्हणजे त्यात आपण काहीच केलेलं नसतं. आपण फक्त बसल्या जागी जगाच्या कोणत्याही विषयांच्या खिडक्यांमध्ये उगाचच डोकावत बसलेलो असतो.

 

(प्राची मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्त्राची अभ्यासक आहे.)

prachi333@hotmail.com