It was not the fear of the career when social service was decided? | समाजसेवा हेच करिअर असं ठरवलं तेव्हा भीती नाही वाटली?
समाजसेवा हेच करिअर असं ठरवलं तेव्हा भीती नाही वाटली?

 निर्माण आणि आॅक्सिजन


गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७०० हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.
म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल..
त्यातला हा दुसरा प्रश्न : समाजसेवा हेच करिअर असं ठरवलं तेव्हा भीती नाही वाटली?प्रश्न खूप होते.भीती वाटलीच नाही असं नाही.पण शोधत गेले,तर उत्तरं दिसू लागली..

अवास्तव
प्रश्न संपले,
वास्तव दिसलं!


नेमकं काय करायला आवडतं? आपला आनंद आणि समाधान कशामध्ये आहे, हे मला माझ्या आयुष्यात थोडं लवकरच समजलं. त्यामुळे करिअर कशामध्ये करू या प्रश्नावर माझा जास्त वेळ गेला नाही. उगीच उपदेश देणारे लोक पण माझ्या आयुष्यात नव्हते की तू हे कर, तू ते कर, त्या क्षेत्रात खूप चांगल्या संधी आहेत, या क्षेत्रात खूप चांगल्या संधी आहेत असे. 
आपल्या गरजेनुसार समाजासाठी काम न करता समाजाची गरज लक्षात घेऊन काम करायचं आहे हे मनाशी ठाम असल्याकारणाने मी सोशल वर्क कॉलेजला जायचं ठरवलं. मी पुण्याच्या कर्वे समाजकार्य महाविद्यालयात प्रवेश घेतला. तरीही मनात मात्र असंख्य प्रश्न आणि भीती होतीच. मग यातून आपल्याला गरजेपुरता पैसा किंवा नोकरी मिळेल का? आपल्याला जे करायचं आहे ते करायला मिळेल का? कामासाठी किंवा समाजासाठी बाहेर जावं लागलं तर कुटुंबाचं काय? घरचे या निर्णयाला पाठिंबा देतील ना? आपला या क्षेत्रात काही ठिकाणा नाही लागला तर परत काय? 
मग पुन्हा विचार केला की, आजकाल कोणत्याच क्षेत्रात करिअरचा भरोसा नाही. शिक्षणाच्या बाजारीकरणाने सर्वच करिअर क्षेत्राची वाट लावली आहे. मग ते क्षेत्र मेडिकल असो वा इंजिनिअरिंग. त्यामुळे पैसा मिळेल की नाही किंवा नोकरी मिळेल की नाही हा प्रश्न फक्त समाजकार्य क्षेत्राचा नाही तर सर्वच क्षेत्राचा आहे. मग नोकरी आणि पैसा मिळेल की नाही हा प्रश्न आपोआप पाठीमागे सुटत गेला. आईवडिलांचं शिक्षण नसल्यानं त्यांनी विरोध आणि पाठिंबा असं काहीच केलं नाही. मी जे करत होते ते त्यांच्यासाठी सर्व काही नवीनच होतं. त्यामुळे आपल्याला जे करायला आवडतं आहे आणि जे करावंसं वाटत आहे तेच काम करणे हाच आपला खूप मोठा फायदा आहे. फायदे-तोटे सर्वच क्षेत्रात आहेत. त्यामुळे जास्त फायद्या-तोट्याचा विचार न करता आपल्याला जे काही करायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं. काम पूर्णत: समाजाशी आणि गावपातळीवर असल्याकारणाने उगीच अवास्तव प्रश्नांची अगोदर वाटणारी भीती संपून गेली होती. 
एकदम काम करायला सुरुवात केल्यानंतर समजलं की, खरं तर लोकांबरोबर आणि लोकांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी तशी समाजकार्य महाविद्यालयाच्या पदवीची काही गरज नाही. आपल्याला फक्त लोकांना आणि लोकांच्या प्रश्नांना समजून घेता आलं पाहिजे. समाजकार्य महाविद्यालय मात्र हे प्रश्न कसे समजून घ्यायचे हे शिकवतात. अगदीच नव्याने उतरून काम करण्यासाठी आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात. समाजकार्य महाविद्यालयामुळे या अडचणी कमी होतात. आपल्या गरजेनुसार काम न करता समाजाच्या गरजेनुसार काम करता आलं पाहिजे. आतापर्यंतच्या अनुभवानंतर मात्र अजून खूप काम करण्याची गरज आहे. ही कामाची नुकतीच सुरु वात आहे. खूप मोठा पल्ला अजून पुढेच आहे, हे मात्र नक्की.
- साधना गुलदगड,
निर्माण ६
(साधना पालघर येथे पुकार या संस्थेसोबत काम करते.)नाकासमोरचं रुटीन काम आणि चंगळ यापलीकडे  मी काहीतरी करतोय याचा आनंद कशात मोजणार?

मी विचार नक्की कुणाचा करणार?

जेव्हा आम्ही गेल्या वर्षी वेगवेगळ्या दुष्काळग्रस्त भागात काम केलं तेव्हा जाणवला खरा पाण्याचा प्रश्न काय आहे ते. त्यातलं राजकारण कसं गावातील समाजकारणावर परिणाम करतं. गावातील स्थलांतर, बेरोजगारी, शिक्षण या प्रश्नांची खरी तीव्रता कितीतरी जास्त गंभीर आहे याची जाणीव झाली. आजूबाजूला सगळे फक्त टीका आणि टीकाच करताना दिसतात. त्यातून मग वाद आणि चर्चाच. खरा प्रश्न जाणून न घेताच लोक मतं मांडायला लागतात.
मग आता करिअरच्या महत्त्वाच्या वर्षात मी माझ्या सुखवस्तू आत्मकेंद्री जीवनाचा विचार करावा की बाजूच्या जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळावर काम करावं?
‘आपण आनंदात असताना दुसऱ्या कोणालातरी आनंदाची गरज आहे याची जाणीव असणं हेच माणुसकीचं खरं लक्षण आहे’ या वाक्यातील माणुसकीची कसोटी लावून पाहिली की माझ्या वरील प्रश्नाचं उत्तर लगेच मिळतं.
करिअरची ही महत्त्वाची वर्षे समाजकार्याला देताना भीती वाटली खरी, पण ती नातेवाईक, आसपासचे लोक यांनी दाखवल्यामुळे. सोबतचे मित्रदेखील पगारवाढ, नवीन गाडी खरेदी, हिमालय ट्रेक इत्यादिंबद्दल सांगत होते. त्यामुळे कधी कधी विचार डळमळायचेदेखील. पण माझ्या कामाचं समाधान, यासोबत माझ्यासारख्याच सामाजिक कार्यात काम करणाऱ्या मित्रांसोबत संवाद आणि वाचन यामुळे वैचारिक अस्थिरतेवर मात करता आली. आणि या भांडवलशाही वातावरणात केवळ उपभोगवादाला बळी न पडता करिअरची महत्त्वाची वर्षे आपण उपयोगात आणतोय याचं समाधानदेखील होतं. छ्राी ्र२ ल्लङ्म३ ुंङ्म४३ ेङ्मेील्ल३२, ्र३२ ं’’ ुंङ्म४३ ीिू्र२्रङ्मल्ल२ ८ङ्म४ ३ं‘ी ्रल्ल ू१्र३्रूं’ २्र३४ं३्रङ्मल्ल२. हे पटलं होतं म्हणूनच सामाजिक क्षेत्रात काम करायचं, कॉर्पोरेट का नको याचा निर्णय घेताना, कॉर्पोरेट क्षेत्रातलं एकच एक साचेबद्ध काम, तेच तेच रुटीन, नावीन्याला नसलेला वाव, यामुळे मरण पावत चाललेली विचारशक्ती आणि क्रिएटिव्हिटी यांचा मला तोटाच होत होता. सामाजिक कार्यात खरंतर सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे स्वत:मध्ये समाजाभिमुख असे बदल करावे लागतात. त्यामुळे क्रिएटिव्हिटी, अभ्यास, संशोधन आणि नवीन आव्हाने हे आत्मसात करावं लागलं. याचा कामामध्ये तर फायदा झालाच, पण माणूस म्हणूनदेखील फायदाच होतोय. खूप फायदा-तोट्याचा विचार करून आपण आपली शक्ती गमावण्यापेक्षा आपल्या कामाचा समाजाला कसा उपयोग होईल याचा विचार आणि कृती हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं..
कविता आठवतेच हे लिहिताना एक..
असे जगावे दुनियेमध्ये
आव्हानाचे लावून अत्तर......

- कुणाल परदेशी,


निर्माण ६

आता काम करणार तर तुझ्या आर्थिक भरभराटीचे काय, सेटल कधी होणार, लग्नाचे काय या प्रश्नांची उत्तरं मी इतरांच्या मर्जीनं का शोधावीत? हे आयुष्य माझे आहे. त्यामुळे मी ते कसं घालवायचं हे ठरवण्याचा अधिकारदेखील माझा आहे. 
- डॉ. हृषिकेश मुनशी, निर्माण ६

फायदा-तोटा या पद्धतीच्या पलीकडेदेखील निर्णयाची एक पद्धत आहे ती म्हणजे निकषाधारित! काय काम करायचं हे ठरवण्याचे माझे निकष काय? केवळ स्वत:ची आर्थिक सुरक्षा/सुबत्ता की अजून काही? 


- एक कार्यकर्ता, निर्माण 


आवडणारं काम, जे नैतिकसुद्धा आहे, ते करण्यास भीती कसली? 

- प्रतीक उंबरकर, निर्माण ६

कामाबद्दलची किंवा पैशाबद्दलची असुरक्षितता असते. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दमछाक होते पण आपलं काम जे समाधान देतं, ते वेगळं असतं.
- रवींद्र चुनारकर, निर्माण ६


प्रश्नोत्तरांचं हे प्रकरण
फार कठीण नाहीये. 
‘निर्माण’ आणि ‘आॅक्सिजन’ यांच्यातला
पूल असेल आकाश भोर.
आकाश स्वत: निर्माणच्या पाचव्या बॅचमध्ये होता
आणि सध्या तो गडचिरोलीलाच सर्चमध्ये काम करतो आहे.
तुमचे प्रश्न आकाशला थेट कळवा.
त्यासाठी ईमेल :

nirman.oxygen@gmail.com
यातल्या निवडक प्रश्नांच्या निमित्ताने होणारा संवाद
आॅक्सिजनच्या अंकात वाचायला मिळेल.
आणि उरलेल्या गप्पांचा आॅनलाइन कट्टा असेल
www.lokmat.com/oxygen
इथे!!!

 


Web Title: It was not the fear of the career when social service was decided?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.