मारूती कदम ,उमरगाजनतेची सुरक्षा करणाऱ्या येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १९३० साली उभारण्यात आलेली घरे खिळखिळी झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव धोक्यात आले आहेत.येथील राष्ट्रीय महामार्गालगत नगर पालिकेच्या शेजारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी १९३० साली चुनखडीच्या सहाय्याने ४८ घरांची उभारणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर २०१२ साली १२ घरे बांधण्यात आली. एकूण दोन एकर जागेच्या परिसरात ६० घरांची उभारणी करण्यात आली आहे. त्याकाळी मर्यादित कुटुंब संख्या समजून घेवून बांधण्यात आलेली घरे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी तुटपूंजी पडू लागली आहेत. शिवाय देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी उभारण्यात आलेल्या या घरांच्या भिंतीचे बांधकाम खिळखिळे झाले आहे. एकूणच जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न गंभीर झाल्याने पोलिस कर्मचारी त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या जागेत नवीन पोलिस कर्मचारी वसाहत उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.पाठपुरावा सुरुयेथील पोलिस कर्मचारी वसाहतीची दुरवस्था झाली आहे. या घरात पोलिस कर्मचाऱ्यांना राहणे त्रासदायक झाले आहे. पालिकेच्या नळपट्टीचा भरणा करुनही एकाही घराला पालिकेने अद्याप नळ कनेक्शन केले नाही. वसाहतीच्या उभारणीबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी लेखी पत्रव्यवहार करुनही उपयोग होत नाही. आमच्याकडे दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी बजेट नाही हे एकच उत्तर गेल्या अनेक वर्षापासून दिले जात आहे. याबाबत नूतन पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनाही माहिती देण्यात आली असून, सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर व पोलिस ठाण्याच्या वतीने पाठपुरावा सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी दिली.
स्वातंत्र्यापूर्वीची वसाहत खिळखिळी
By admin | Updated: August 31, 2014 01:09 IST