आशिष कामडी
पांढरकवडा (यवतमाळ) -
नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे अलीकडेच जाहीर झाली. भारताच्या कैलास सत्यार्थीना शांततेचा नोबल पुरस्कार मिळाला. आनंदाचीच गोष्ट आहे. पण एक खंत मला नेहमी वाटते, ती म्हणजे आपल्या देशातील व्यक्तींना विज्ञानातील नोबेल (तेही आपल्याच देशात काम करून) का बरे मिळत नाही?
विज्ञानात नोबेल मिळवणा:या राष्ट्रात काही फक्त अमेरिकाच आघाडीवर नाही. अन्य देशांनाही ते मिळतेच. मग आपल्याला का नाही? कारण आपलं इंग्रजी वेड. आपल्या देशात विज्ञान बालपणापासून महाविद्यालयार्पयत मातृभाषेतच शिकण्याची आणि तोही अत्यंत आनंददायी, संपूर्णत: उत्साही, चौकस पद्धतीने शिकण्याची काही सोयच नाही.
विज्ञान म्हटलं की, इंग्रजीतूनच शिकायला हवं. मग ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना विज्ञानाची दारं बंदच. आपल्या देशात दहावीर्पयत मातृभाषेतून विज्ञान शिकणारा विद्यार्थी, पण अकरावीला सायन्सला अॅडमिशन घेतलं की सगळं इंग्रजीच. मग मार रट्टा नि ओत पेपरात. केवळ इंग्रजीच्या भीतीमुळे अनेकजण सायन्सला जात नाहीत. आपल्याकडे दहावीनंतर मातृभाषेतूनच विज्ञान शिकण्याची सोय का बरं करता येऊ नये?
मला वाटतं, जे सायन्स इंग्रजीतून शिकतात, ते नुस्ता रट्टा मारण्यात ताकद वाया घालवतात. नवीन काही सुचत नाही. कारण इंग्रजी आडवं येतं.
बेसिकच जर असं कच्चं असेल तर कुणाला का मिळावं नोबेल?