नाही म्हणजे जाम प्लॅनिंगबिनिंगमधे बिझी असाल तुम्ही आता.
आठ दिवसावर आलंय नवरात्र? गरब्याचे पास, त्यासाठीच्या फिल्डिंगा, कपडे, शंभर कामं आहेत सध्या.
त्यात मदत व्हावी म्हणून तर ह्याच अंकात तुमच्यासाठी भन्नाट प्लॅनरच देतोय.
ते वाचाच. तयारी करा.
पण?
दोन गोष्टींबाबत मात्र जरा थेट मोकळेपणानं बोलायलाच हवं !
१) गरबा खेळायला जा, मस्त ताल धरून नाचा, पण त्यात वाढलेल्या अपप्रवृत्तींपासून दूर रहायची जबाबदारी कुणाची?
- आपलीच !
सुसाट गाड्या चालवणं, दारू पिणं, आरडाओरडा करत फिरणं, मुलींना छेडणं, हे सारं याकाळात टाळलं तर आपल्या सणांचं पावित्र्य कायम राहील !
नाहीतर नुस्ता धिंगाणा यापलीकडे या सणांना काय अर्थ उरेल?
विचार करा !
२) हे सारं एकीकडे सुरू असतानाच लोकशाहीतल्या सगळ्यात मोठय़ा उत्सवाचं तोरण लागलंय. विधानसभेची निवडणूक पुढच्या महिन्यात होते आहे.
तुमचं नाव आहे का मतदार यादीत? तपासलंय का?
कुणाला मत द्यायचं याचा केलाय का काही अभ्यास?
नसेल केला तर करा !
गरबा आणि नवरात्री दरवर्षी येतात, पण निवडणूक मात्र ५ वर्षातून एकदाच येते. आपल्यासह राज्याच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे.
त्यामुळे या सार्या धामधुमीत याही उत्सवाकडे लक्ष ठेवा.
दिवस धामधुमीचे आहेत हे नक्की..
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com