- निनाद देशमुख
श्रीहरिकोटा हे नाव, माझ्याही स्वप्नातलं एक गाव होतं. जसं आपल्या देशात अनेकांच्या असतं. भारतानं म्हणजेच इसरोनं अवकाश विज्ञानात घेतलेली भरारी, उपग्रहांचा प्रक्षेपण हे सारं याची देही याची डोळा पाहण्याचं स्वप्न मीही अनेक वर्षे माझ्या नजरेत घेऊन जगलो.अवकाश विज्ञानाचं, इसरोच्या विविध कामगिरींचं आकर्षण होतंच; पण प्रत्यक्ष प्रक्षेपण कधी पाहिलं नव्हतं. यावेळी जेव्हा चांद्रयान 2 च्या प्रक्षेपणाची चर्चा सुरू झाली तेव्हाच मी ठरवलं होतं की या प्रक्षेपणाच्या वेळी आपण तिथं जायचं. पत्रकार म्हणून ते चांद्रभरारी कव्हर करणं हे स्वप्न मला खुणावत होतं. नुकताच मी डीफेन्स स्टडीचा कोर्स करून आलो होतो. त्यामुळे थोडी ओळखपाळख काढली. आणि मला थेट प्रक्षेपण कव्हर करायला जायची संधी मिळाली.मनात अनेक प्रश्न होते, कुतूहल होतं. त्या जगाची आणि आपली प्रत्यक्ष ओळख होणार म्हणून खुश होतो. अभ्यास केला. काही माहिती, अवकाश विज्ञान आणि प्रक्षेपण यांच्या परिभाषा हे सारं समजून घेतलं. काही जुजबी वाचन केलं आणि निघालो. मात्र या सार्या माहितीपलीकडचा तो थरार, ती खर्या अर्थानं पृथ्वीची कक्षा भेदून जाणारी भरारी मला अनुभवायची होती.मात्र पहिल्यावेळी प्रक्षेपण रहित झालं. अगदी आपण त्या केंद्रात आहोत आणि प्रक्षेपण होणार नाही असं वाटल्यावर थोडं निराश वाटलं; पण तिथला माहौलच असा होता की आपण परत येऊ अशी खातरीच वाटत होती. झालंही तसंच.लवकरच पुन्हा तारीख जाहीर झाली आणि आम्ही पुन्हा प्रक्षेपणस्थळी पोहोचलो.काय नव्हतं तिथं.अवकाश भरारीचं वेड पंखातच असावं लागतं वगैरे व्हॉट्सअॅप टीपिकल फॉरवर्ड आपण वाचत असतो. पण ते वेड, तो थरार, कामावरची अमिट श्रद्धा, परफेक्शन हे सारं माझ्या डोळ्यासमोर होतं. संपूर्ण देशाची मनं उंचावणारा हा सोहळा पाहण्यातही विशेष गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती. शास्त्रज्ञांचं मनोबल वाढविण्यासाठी हातात झेंडे घेऊन शाळा-शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्या नजरेत तेच कुतूहल होतं, जे तिथं जमलेल्या प्रत्येकाच्या नजरेत होतं. भरपूर लोक होते.एवढंच कशाला आमच्यासोबत मीडिया गॅलरीत अनेक माध्यमांचे वाहनचालक होते. गॅलरीत जेवणखाण देणारे वेर्ट्स होते. जो तो त्या एका क्षणाची वाट पाहत होता.अखेर प्रक्षेपणपूर्व अखेरच्या टप्प्यातील उलटी गिनती सुरू झाली. पाच -चार -तीन -दोन -एक आणि झिरो.
(निनाद लोकमतच्या पुणे आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहे.)