...चॅलेंज तो खुदसे ही है!

By admin | Published: April 7, 2016 12:35 PM2016-04-07T12:35:58+5:302016-04-07T12:35:58+5:30

आपल्या डोक्यात करिअरविषयी गोंधळ उडालाय म्हणजे हे आपलं अपयश आहे असं समजू नका. ‘अनेकातून एक’ निवडायचं आव्हान असताना असा गोंधळ होणारच, पण जेव्हा तो सोडवायची वेळ येईल तेव्हा कधीही ‘लेट’ झालाय आता असं म्हणू नका त्याऐवजी म्हणा, लेट्स डू इट!

Challenge is itself! | ...चॅलेंज तो खुदसे ही है!

...चॅलेंज तो खुदसे ही है!

Next
‘मला तेव्हा वाटलं होतं की मी हे करू शकेन. पण आता असं वाटतंय की माझं चुकलंच. 
हे मी करायला नकोच होतं. ’
**
‘मी शिक्षण पूर्ण करत असतानाच नोकरी करायचा निर्णय घेतलाय. पण नोकरी सोडून आता पुन्हा शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं वाटतं पण कधी वाटतं, मिळालेली नोकरी कशाला सोडायची? त्यापेक्षा शिक्षणात खूपच वेळ जातोय. 
**
‘मी एका कोर्सला प्रवेश घेतलाय. पण एकाच्या प्रेमात पडल्यामुळे कोर्सकडे लक्ष केंद्रित होत नाहीये. काडीचाही अभ्यास होत नाहीये. महागडा कोर्स असल्याचं टेन्शनही येतंय.’
**
‘नोकरी करतो आहे, पण हे सोडून व्यवसाय करावासा वाटतोय.’ करू का?’
**
‘कॅम्पस इंटरव्ह्यू देऊन नोकरी मिळाली आहे. सगळं चांगलं आहे. पण यापेक्षा वेगळी नोकरी शोधावीशी वाटते आहे.’
***
हे सारे प्रश्न तुमचेच आहेत, माझ्यापर्यंत गेल्या काही दिवसात इमेलने आलेले हे प्रश्न. हे प्रश्न सांगतात, करिअर निवडीसंदर्भातला तुमचा प्रचंड गोंधळ उडालेला आहे. 
आणि ज्यांनी निवड करून नोकरी स्वीकारली, किंवा र्कोर्सेस निवडले तेही संभ्रमातच दिसतात की, आपण जे करतोय ते चूक आहे की बरोबर?
पण हे असं वाटतंय तो आपल्या मनातला करिअरविषयक गोंधळ हा फार मोठा गोंधळ आहे, असं समजू नका. ते अपयश आहे असं समजू नका. ही प्रक्रि या आहे. ‘अनेकातून एक’ निवडायचं आहे. या प्रक्रि येत असं होणारच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही ‘लेट’ झालाय असं समजू नका. लेट्स डू म्हणत राहा. 
 
तीन कारणं, एक घोळ
 
माणसानं कितीही शिक्षण घेतलं आणि कितीही प्रमाणपत्रं मिळवली तरी स्वत:च्या मनात डोकवून बघायचं शिक्षण कुठेच मिळत नाही. ही गोष्ट स्वत:लाच शिकावी लागते. त्यादृष्टीने स्वत:च्या मनाला विकसित करावं लागतं.  ते जमत नाही म्हणून निर्णय घेताना धास्ती तरी वाटते किंवा घेतल्यावरही ते निर्णय चुकीचे आहेत, आपल्याला दुसरंच काहीतरी हवं असा संभ्रम वाढतो. करिअर निवडीच्या टप्प्यावर असा घोळ घालत अनेकजण आपला महत्त्वाचा वेळ वाया घालवतात. असं होतं याची ही तीन कारणं.
 
1. निर्णय घेताना सर्व बाजू विचारात घेतल्या नाहीत.
 
 निर्णय घेताना एखादी गोष्ट बरी वाटते. नंतर ती आवडत नाही, असं होऊ शकतं. त्यावेळी आपल्याला वाटतं की आपण पूर्ण विचार केला आहे. पण तसं नसतं. खरं तर ही गोष्ट  नैसर्गिकच आहे.  व्यक्तिगत पातळीवर बघायचं तर आयुष्यातली सातत्याने चालणारी एकमेव गोष्ट म्हणजे बदल. तो आपल्या कळत आणि नकळत होतच असतो. त्यामुळे हे लक्षात घ्या, की प्रत्येक गोष्ट बदलणार आहे. आयुष्यात चढ-उतार हे होतच असतात; मात्र कोणतीही गोष्ट टिकत नाही. दोन्हीही तात्पुरतं असतं. चांगल्या गोष्टी या आपल्या आसपासच कुठेतरी आहेत. त्या घडणार आहेतच, यावर विश्वास ठेवा. तोपर्यंत खूप मेहनत करा. आणि मनात आशा जिवंत ठेवा.
 
2. जे दुस:याला मिळालंय ते जास्त चांगलं वाटतं. 
हाही मानवी स्वभाव आहे. एखाद्या गोष्टीची आशा असणं, अपेक्षा ठेवणं यासुद्धा सकारात्मक गोष्टीच आहेत; मात्र तोपर्यंत आपण थांबून राहू शकतो का? असं थांबून राहणं परवडेल का आपल्याला?
त्यापेक्षा आपण जिथे आहोत ते करत राहा, पण ‘ते दुसरं जे काही आहे’ त्याकडे लक्ष ठेवा. संधी मिळवा. आणि ती मिळाली तर स्वत:ला सिद्ध करा. पण फक्त ते दुस:याला मिळालं तेच चांगलं, आणि आपल्याला का मिळालं नाही, असं वाटून जळकुकडेपणा करण्यात काहीच अर्थ नाही.
 
3. आपली ध्येयं डळमळीत होत, आपलं लक्ष उडालेलं किंवा भरकटलेलं आहे.
 
एका क्रि केटच्या सामन्यात कपिल देव कॉमेंट्री करत होते. तेव्हा खेळपट्टीवर उभ्या चांगल्या पण त्यावेळी अतिशय झगडणा:या फलंदाजाबद्दल म्हणाले, ‘इनका चॅलेंज तो खुदसे ही है!’ हे असं स्वत:लाच चॅलेंज केलंय का कधी आपण? मी जे ठरवलंय, जिथपर्यंत पोहचायचं आहे, तिथे पोहचूनच दाखवेन, असं आव्हान दिलंय का? ते देऊन बघा. 
आपल्या विचारांमागचं शास्त्र असं सांगतं की, विचार हे मनात येतच असतात. ते थांबवायचे असतील आणि ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायचं असेल तर एकच करायचं,  स्वत:च्या मनाला अतिशय स्पष्ट शब्दात सूचना द्यायची. 
अभ्यासाच्या वेळी जर मनात इतर व्यक्तींचे किंवा आपल्या ध्येयाबद्दल उगाचच साशंकतेचे विचार येत असतील तर ते तिथल्या तिथे थांबवायचे; मात्र पहिल्या विचारांना बाजूला सरकवतो तो दुसरा विचारच. त्यामुळे अतिशय चांगला सकारात्मक विचार आपल्याकडे तयार पाहिजे. 
हा पर्यायी सकारात्मक विचार किंवा सुविचार किंवा गाण्याची एखादी प्रेरक ओळ किंवा आपल्याला आदर्श वाटणा:या व्यक्तीचं स्मरण यापैकी काहीही एक असू शकतो; मात्र नको त्या विचारांना बाजूला सारण्याचा हा एक चांगला सोपा उपाय आहे.  हा उपाय दिवसातून शंभरदाही करावा लागेल. तो करा. पण ध्येयापासून बाजूला होऊ नका. 
 
डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
drshrutipanse@gmail.com 

Web Title: Challenge is itself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.