निर्माण आणि आॅक्सिजन
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरंतर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं. गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७०० हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल.. त्यातला हा चौथा प्रश्न : मूल्यं-तत्त्वं यांच्यासह जगता येतं?
प्रायॉरिटी काय? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला की उत्तरं सापडतातच!मूल्यव्यवस्था काय असते? माझ्या जीवनात मूल्यं असावीत का? असावीत तर का? - हे प्रश्न माझ्या मनात कधीच निर्माण झाले नव्हते. जेव्हा निर्माणचं शिबिर केलं त्यावेळी मूल्य, तत्त्व आणि जीवनध्येय या शब्दांची ओळख झाली. मग कळलं की जीवनात मूल्यांचं मूल्य आहेच. ज्याप्रमाणे गणितामध्ये समीकरण सोडवताना एक्सची किंमत काढावी लागते तसंच जीवनाचे प्रश्न/समीकरण सोडविण्यासाठी मूल्यं ठरवणं आवश्यक असतात. तरच जीवनाचं समीकरण योग्य सुटू शकेल.मी एक डॉक्टर आहे. नागपूरहून बीएएमएसची पदवी घेतली. मेडिकलची डिग्री घेतल्यावर आता पुढे काय करू हा गोंधळ प्रत्येकाच्या मनात असतो. माझ्याही होता. परंतु निर्माणचं शिबिर केल्यावर गोंधळ जरा कमी व्हायला लागला. माझ्या जीवनात मी ज्या गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व देतो त्या गोष्टी म्हणजे माझी मूल्यं असतात. ती मी हळूहळू डिफाइन करत गेलो. कामाचं समाधान न देणारी सरकारी नोकरी सोडून वैद्यकीय सेवा देण्याचा आनंद आणि समाधान देणारी गडचिरोलीतल्या फिरत्या दवाखान्यातली नोकरी करण्याचा निर्णय याच मूल्यांमुळे घेता आला. मी जे काम करतो आहे त्यानं मला आनंद मिळायला हवा आणि समाधान पण हे मूल्य. सध्या मी जळगाव व अंतुर्ली येथे दवाखाना चालवतो आहे. दवाखाना चालवत असताना अनेक प्रलोभने माझ्यासमोर आली. पण माझं मूल्य आहे की कट प्रॅक्टिस करणार नाही. त्यामुळे मला त्यापासून दूर राहता येतं. आणि मी ते करत नाही याचा आनंद मिळतो. कट प्रॅक्टिस हा मेडिकल फिल्डमधला एक गहन चर्चेचा विषय आहे. चिकित्सा करताना परिणामकारकता, गुणवत्ता आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस ही मूल्यंपण जोपासतो आहे. त्यामुळे रुग्णाची ट्रीटमेण्ट करताना हलगर्जीपणा येत नाही आणि रुग्ण कमी पैशात लवकर बरा होतो. आनंदी राहतो.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्य बदलत जाऊ शकतात. शिक्षण घेत असताना, नोकरी करत असताना, लग्नानंतर मूल्य बदलत जातात. आज पैसा कमविणे कदाचित माझी प्रायोरिटी असेल, उद्या पुरेसा मिळाल्यावर नसेलही. जीवनातील माझ्या प्रायोरिटीज बदलल्या की मूल्यं बदलतात. तत्त्वं मात्र आजीवन तीच राहतात. मूल्य म्हणजे अशा गोष्टी ज्या जगताना माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. कुणाला फिजिकल फिटनेस, आरोग्य, एकता, समानता, शिस्त, प्रामाणिकपणा, परिवार, प्रतिष्ठा, कठोर मेहनत, एकता, खरं बोलणं असतात, जी प्रत्येकाची निराळी असू शकतात.मूल्यं प्रत्येकाच्याच जीवनात असतात, परंतु आपल्या मूल्यांशी आपला परिचय नसतो. ज्यावेळी आपला मूल्यांशी परिचय होतो तेव्हा जगताना निर्णय घेणं अधिक सोपं होऊन जातं. मी कुठला जॉब निवडू? मी नोकरी करू की व्यवसाय करू? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आपली मूल्यव्यवस्था मजबूत असेल तर आपण सोडवू शकतो. आपल्या मूल्यांच्या यादीत सगळ्यात वर कुठल्या आहेत आणि खाली कोणती आहेत याची क्रमवारी लावणं महत्त्वाचं आहे. एखाद्या परिस्थितीत निर्णय घेताना माझ्या जीवनात कुठली मूल्यं सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यानं निर्णय घेताना गोंधळ होणार नाही. वैयक्तिक मला जगताना या मूल्यव्यवस्थेचा फायदा जीवनाच्या प्रत्येक वळणावरून जाताना होतो आहे. - भूषण देव, निर्माण ५