-ऑक्सिजन टीम
गोपीचंद फॅक्टरी.हे दोन शब्द बॅडमिंटनच्या जगात आयुष्य बदलून टाकणारी जादू आहे. हैदराबादच्या गोपीचंद अकॅडमीत पहाटेपासून पालक रांगा लावतात. आपली मुलं खूप टॅलेंटेड आहेत, तर त्याच्या आयुष्याचं सोनं याच अकॅडमीत होईल असा विश्वास पालकांना वाटतो.आता हैदराबादमध्ये एक नाही तर दोन ठिकाणी अकॅडमीचं प्रशिक्षण चालतं, मात्र तरीही जागा कमी आणि गर्दी जास्त अशी स्थिती आहे.मात्र या अकॅडमीत प्रवेश मिळणं सोपं नाही. कारण बॅडमिंटन हा खेळ केवळ ग्लॅमर, पैसा आणि प्रसिद्धी यापलीकडे जाऊन अत्यंत निष्ठेनं, मेहनतीनं खेळण्याचा खेळ आहे, असं ज्याला वाटतं त्या गोपीचंदने ती अकॅडमी जन्माला घातली आहे.27व्या वर्षी त्यानं निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी उत्तम खेळत बॅडमिंटनला नवीन ओळख त्यानं मिळवून दिली. पण गुडघ्याच्या दुखापतीनं त्याला ग्रासलं होतं. त्यावेळी त्यानं आपल्या आईला हा विचार बोलून दाखवला होता की, मला जर उत्तम कोचिंग मिळालं असतं, दुखापतींचं नीट नियमन झालं असतं तर मी अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो. आपल्याकडे मुलांना असं उत्तम ट्रेनिंग मिळायला हवं.ट्रेनिंगचं महत्त्व त्याला आणि त्याच्या आईलाही होतंच. एकेकाळी केवळ मुलाच्या फुलांचा खर्च सुटावा म्हणून त्याची आई बसने किंवा चालत कामाला जात असे. त्यामुळे मग त्यांनं आपलं राहातं घर गहाण ठेवून सुरुवातीला अकॅडमी सुरू केली. 2001 ची ही गोष्ट. पुढे 2008 मध्ये उद्योजक निम्मगडा प्रसाद यांनी त्याला 50 कोटी रुपये देणगी दिली, ते ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याच्या अटीवर. आणि तिथून ही गोपीचंद अकॅडमी सुरू झाली.आज ती गोपीचंद फॅक्टरी म्हणून जगभर नावाजली जाते आहे. त्या फॅक्टरीतून शिकून बाहेर पडलेले खेळाडू आज भारतीय बॅडमिंटनची शान आहेत, चॅम्पिअन आहेत.मात्र या अकॅडमीची शिस्त मोठी. पहाटे 4.30 ला प्रॅक्टिस सुरू. मुलं लहान असोत की मोठी, एकदम शांतता. आवाज येतो तो फक्त पळण्याचा आणि रॅकेट-फुलांचा. कुणाही मुलाला आठवडाभर फोन वापरायची परवानगी नाही. फक्त रविवारी फोन वापरला तर चालतो. सोशल मीडिया अकाउंट उघडून टाइमपास करण्याची तर मुभा नाहीच नाही. ठरवून दिलेल्या डाएटप्रमाणेच खायचं, ठरल्या प्रमाणातच खायचं.शिस्तभंग नावाची गोष्टच गोपीसरांना चालत नाही.गोपीचंद सांगतात, ‘जर चॅम्पिअन व्हायचं असेल तर आयुष्यात तडजोड करून चालत नाही. कुणाही खेळाडूचं आयुष्य सोपं नसतं. स्वतर्ला खेळाडू म्हणून घडवणंही सोपं नसतं. पूर्ण फोकस. संपूर्ण समर्पण, मेहनत आणि सराव याशिवाय जिंकताच काय उत्तम खेळताही येऊ शकत नाही.जिंकायचं कसं हे तर गोपीसर आपल्या विद्याथ्र्याना सांगतातच, पण जगायचं कसं याचे धडेही या अकॅडमीत प्रत्यक्षच दिले जातात.साधेपणा, सराव आणि ढोर मेहनत यापलीकडे कुणाला काही सुचू नये इतकं जिकिरीचं ट्रेनिंग हेच या फॅक्टरीच्या यशाचं गुपित आहे.