हा स्टायलिश फॉर्म्युला वापरून पाहा.
आजपासून बरोबर आठ दिवसांनी, पुढच्या शुक्रवारी गणपती बाप्पाचं आगमन होईल.
तुमच्या कॉलेजात, ऑफिसमध्ये, घरी, अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे गणपती असेल. गणेश चतुर्थी, गौरी पूजन ते गणपतीतला एखादा कार्यक्रम, अनंत चतुर्दशी अशा वेगवेगळ्या प्रसंगी काय घालायचं, असा प्रश्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्हाला सतावत असेल.
तर या दहा दिवसांचं स्टाइल स्टेटमेण्ट प्लॅन करण्यासाठी या काही सोप्या गाइडलाइन्स.
ट्रेण्डी दिसणं हीच सध्या एक मोठी फॅशन आहे, त्यामुळे गणपतीच्या दहा दिवसांतही तसा फेस्टिव्ह मूड सांभाळायला हवा.
तो सांभाळायचा तर सलग दहा दिवसांचा विचार करण्यापेक्षा ४+३+२+१=१0 असा हा फॉर्म्युला प्लॅन करा.
मग बघा, तुम्ही दिसालही मस्त आणि तुमचा मूडही एकदम खुलून जाईल.!
प्लॅन ४
तरुण मुलांसाठी तर कुर्ते+पायजमा हे कॉम्बिनेशन असतंच, पण मुलींचा प्रश्न मोठा. त्यासाठी हा प्लॅन. ३ ट्रॅडिशनल साड्या आणि एक नऊवारी असा हा प्लॅन करा. सिल्कच्या पारंपरिक साड्या, त्यांचे मस्त ब्राईट कलर्स असे निवडून ठेवा. कुठली साडी गणेश चतुर्दशीला, कुठली गौरींना, कुठली हळदी कुंकवाच्या दिवशी, कुठली कुणा ‘खास’च्या घरी जायचं असेल तेव्हा, असं सगळं प्लॅन करा.
या साड्यांवर शक्यतो ट्रॅडिशनल ज्वेलरीच वापरा.
प्लॅन ३
गणपती, गौरी आणि एखादा आणखी दिवस असे तीनच दिवस तुमच्यासाठी समजा महत्त्वाचे आहेत, तर तुम्हाला आवडत असतील तर तीन ट्रॅडिशनल साड्या किंवा तीन सिल्कचे ट्रॅडिशनल कुर्ते असं कॉम्बिनेशन ठरवा.
साड्यांमध्ये क्रेप सिल्क, टस्सर सिल्क, शिफॉन, जॉर्जेट असे प्रकार निवडा. अनारकली किंवा एम्ब्रॉयडीवाला चुडीदार कुर्ताही छान दिसेल.
त्यावर भरजरी दागिने घालण्याचा आटापिटा करू नका. एखादंच लांब नेकलेस किंवा फक्त लांब मोठे कानातले, ब्रेसलेट, एखादी कुडी एवढं घातलं तरी पुरे. तुम्ही दुसर्याच्या घरी कार्यक्रमाला जाणार असाल तर फार सजून जायची गरज नाही, आपण छान दिसल्याशी कारण, फार तामझाम टाळलेला चांगला.
प्लॅन २
असं काही फार तामझामवालं तुम्हाला नकोय. फक्त कुणाकडे तरी जायचंय. ऑफिसात किंवा कॉलेजात कार्यक्रम आहे. मूडला साजेसं फक्त काहीतरी घालायचंय. तर मग फक्त एथनिक टच असलेले कपडे घाला. कॉटन सिल्कचे कुर्ते, प्रिण्टेड चुडीदार, दुपट्टा, कॉटनची साडी असं कॉम्बिनेशन करता येऊ शकेल. रंग निवडतानाही शक्यतो लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी असे रंग निवडा. सिम्पल तरी फेस्टिव्ह असा हा लूक. फक्त डल कलर तेवढे घालू नकाच.
दागिनेही फक्त एखादं मोत्याचं पेडंट असलेली चेन, मोत्याचे लहानसे कानातले, बांगडी, एवढं पुरे.
प्लॅन १
हा खास अनंत चतुर्दशीचा दिवस.
तुम्ही विसर्जनाला जाणार आहात हे लक्षात ठेवा. फार झागरमागर कपडे घालण्यापेक्षा लाईट कलरचे, जरा जाडसर फॅब्रिकचे कपडे घाला. ओले झाले तर ते कपडे ट्रान्सपरण्ट दिसता कामा नये. ट्रॅडिशनल नेहमीचा सलवार कुर्ता, चुडीदार घाला. पण रंग आणि फॅशनपेक्षाही या दिवशी अन्य गोष्टींना महत्त्व द्यायला हवं. तुम्ही रस्त्यावर नाचणार असाल तर फार घट्ट, खोल गळ्यांचे कपडे वापरू नका. कुर्ता घालतानाही तो योग्य मापाचा, बंद गळ्याचा आहे ना हे तपासून घ्या. गुलाल उडवणारे लोकं, पाऊस, अनोळखी गर्दी यात फॅशनपेक्षा सुरक्षितता आणि डिसेन्सी सांभाळलेली बरी!
- प्राची खाडे
पर्सनल स्टायलिस्ट