US Open 2025 : अमेरिकन ओपन स्पर्धेत पुरुष एकेरी किंवा महिला एकेरीत एकही भारतीय खेळाडू आपली जागा निश्चित करू शकला नाही. पण पुरुष दुहेरीत मात्र जेतेपदाची आस निर्माण झालीये. भारताचा टेनिसपटू युकी भांबरी याने आपल्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करून दाखवताना पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनससोबत युकी भांबरीनं उपात्य पूर्व फेरीत क्रोएशियाचा निकोला मेकटिच आणि अमेरिकेचा राजीव राम या अनुभवी जोडीला पराभवाचा धक्का दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
युकी अन् मायकेल जोडीसमोर फिकी ठरली निकोला अन् राजीव राम ही जोडी
युकी भांबरी आणि मायकेल व्हीनस जोडीनं पुरुष दुहेरीतील उपांत्य पूर्व फेरीत कमालीची सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये निकोला मेकटिच आणि राजीव राम जोडीला ६-३ असे बॅकफूटवर ढकलेले. दुसऱ्या सेटमध्ये कांटे की टक्कर झाली. पण इथंही युकी भांबरी आणि मायकेल व्हीनसनं टाय ब्रेकरमध्ये बाजी मारत हा सेट ७-६ (८-६) अशा फरकाने आपल्या नावे केला. तिसऱ्या सेट ६-३ असा जिंकत या जोडीनं स्पर्धेतील आपली आगेकूच कायम ठेवली. आता उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर नील स्कूप्स्की आणि जो सॅलिसबरी जोडीचे आव्हान असेल.
आशिया चषक हॉकी: यजमान भारताला कोरियाने रोखले; निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत
पहिल्यांदाच खेळणार ग्रँडस्लॅम स्पर्धेत मारली उपांत्य फेरीत धडक
३३ वर्षीय भारतीय टेनिस स्टारनं टेनिस कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या सेमफायनलमध्ये धडक मारली आहे. याआधी भांबरी याने अल्बानो ओलिवेटी याच्या साथीनं अमेरिकेन ओपन स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी त्याचा प्रवास हा उपांत्य पूर्व फेरीतच संपुष्टात आला होता. जर फायनल गाठून इतिहास रचायचा असेल तर आता युकी भांबरी आणि मायकेल व्हीनस जोडीला टेनिस क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या जोडीला नमवावे लागेल.
आतापर्यंत ३ भारतीयांनी जिंकली आहे US ओपन स्पर्धा
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकाही भारतीयाला एकेरीत जेतेपद मिळवता आलेले नाही. पण मिश्र दुहेरीत भारतीय खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली आहे. भारताचा टेनिस स्टार महेश भुपती लिएंडर पेस माजी महिला टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी मिश्र दुहेरीत छाप सोडल्याचा रेकॉर्ड आहे. जर युकी भांबरीनं फायनल मारली तर पुरुष दुहेरीत जेतेपद पटकवणारा तो पहिला भारतीय ठरेल.