अॅडिलेड : भारताचा अनुभवी आणि वरिष्ठ वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा गुडघ्याच्या जखमेतून सावरला नसल्याने शनिवारी विश्वचषकाबाहेर झाला. यामुळे भारताच्या विश्वचषक मोहिमेला जबर धक्का बसला आहे. अन्य तीन जखमी खेळाडू मात्र फिटनेस टेस्टमध्ये यशस्वी ठरले.सरावादरम्यान ईशांतला त्रास होत असल्याने त्याला अनफिट घोषित करण्यात आले. जखमी ईशांतचे स्थान मोहित शर्मा हा मध्यम जलदगती गोलंदाज घेणार आहे. ईशांतशिवाय रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांची आज फिटनेस चाचणी घेण्यात आली. ईशांत फिटनेसमध्ये उत्तीर्ण होऊ शकला नाही. सिडनी येथे तो अखेरचा कसोटी सामना खेळला होता. बीसीसीआयच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विश्वचषकात ईशांत नसेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. नियमानुसार आमच्याकडे राखीव म्हणून मोहित शर्माचा पर्याय उपलब्ध आहे. मोहितला विश्वचषकाच्या संघात स्थान दिले जाईल. ईशांत लवकरच मायदेशी परत येईल.’हा अधिकारी म्हणाला, ‘रोहित शर्मा हा हॅमस्ट्रिंगमुळे, भुवनेश्वर घोट्याच्या जखमेमुळे आणि रवींद्र जडेजा खांदेदुखीमुळे त्रस्त होते. तिघांनी फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली. आणखी फिटनेससाठी या तिघांना आॅस्ट्रेलिया आणि अफगाणविरुद्ध सराव सामने खेळावे लागतील.’सूत्रांनी सांगितले, की डिप थ्रो फेकतेवेळी जडेजाच्या खांद्याला त्रास होतो का, हे पडताळून पाहावे लागेल. रोहित आणि भुवनेश्वर यांना पूर्णपणे फिट ठरविण्यात आल्यानंतरच त्यांना मीडियापुढे आणण्यात आले. बीसीसीआयने मात्र अद्यापही ईशांत बाहेर झाल्याची अधिकृत घोषणा केली नाही. ईशांतला चार आठवडे ब्रेक दिल्यानंतर २६ जानेवारी रोजी सिडनीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात संधी देण्यात आली होती. पण, १६ षटकांनंतर हा सामना पावसामुळे गुंडाळण्यात येताच, ईशांतला गोलंदाजीची संधी मिळू शकली नव्हती. (वृत्तसंस्था)