पुणे : आॅस्ट्रेलियाला भारतीय कर्णधार विराट कोहली दमदार पुनरागमन करेल, अशी चिंता सतावत असल्याचे आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने म्हटले आहे. कोहली दोन्ही डावांत झटपट बाद झाल्यामुळे आॅस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी सामन्यात एकतर्फी विजय मिळवता आला. पुणे कसोटी सामन्यात कोहलीला पहिल्या डावात खातेही उघडता आले नव्हते तर दुसऱ्या डावात केवळ १३ धावा काढून बाद झाला. भारताला या कसोटी सामन्यात ३३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आॅस्ट्रेलियाने जवळजवळ १३ वर्षांनंतर भारतात पहिला कसोटी विजय नोंदवला. स्टार्कने पहिल्या डावात कोहलीला बाद केले होते. मंगळवारी पत्रकारांसोबत बोलताना स्टार्क म्हणाला, ‘कोहली जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, याची सर्वांना कल्पना आहे. त्याने यंदाच्या मोसमात यापूर्वीच खोऱ्याने धावा फटकावल्या आहेत. आम्हाला विराटच्या पुनरागमनाची चिंता करावी लागणार आहे. मालिकेतील उर्वरित लढतींमध्येही त्याची विकेट महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेत विजय मिळविण्यासाठी त्याला आणखी सहा वेळा बाद करावे लागणार आहे.’ कोहलीला बाद करण्यापूर्वी स्टार्कने चेतेश्वर पुजाराला माघारी परतवले होते, पण भारतीय कर्णधाराला बाद करणे अधिक महत्त्वाचे होते, असे त्याने सांगितले. स्टार्क म्हणाला, ‘आम्हाला कल्पना आहे, की तो दमदार पुनरागमन करेल, पण पुजाराच्या तुलनेत त्याला बाद करणे अधिक महत्त्वाचे होते.’(वृत्तसंस्था)आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघातर्फे कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा स्टार्क म्हणाला, ‘पहिल्या कसोटी सामन्यात सर्वकाही आमच्या मनाप्रमाणे घडले, पण केवळ एका सामन्याच्या बळावर मालिका जिंकता येणार नाही, याची कल्पना आहे. अद्याप तीन महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत.’
आॅस्ट्रेलियाला सतावत आहे कोहलीच्या पुनरागमनाची चिंता
By admin | Updated: March 1, 2017 06:10 IST