मुंबई : जवळपास दोन वर्षांपासून भरतीय संघातून बाहेर असलेल्या वीरेंद्र सेहवागने वर्ल्डकप स्पर्धेच्या संभाव्य भारतीय संघात आपले नाव असेल असे मत व्यक्त केले आहे. स्थानिक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात अपयश येऊनही सेहवागच्या या आशावादाने सर्वांना आश्चर्यचकित केले. वर्ल्डकप चषक भारतीय दौऱ्यावर असून याच दौऱ्यानिमित्ताने मुंबईत सेहवाग बोलत होता. याआधी २००३, २००७ आणि २०११च्या वर्ल्डकपमध्ये खेळलेला सेहवाग म्हणाला, मला आशा आहे की वर्ल्डकपसाठीच्या संभाव्य संघात माझे नाव असेल. प्रत्येकाला देशासाठी वर्ल्डकपमध्ये खेळण्याची इच्छा असते. माझे आजही हेच स्वप्न आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११मध्ये वर्ल्डकप जिंकला होता आणि जेतेपद कायम राखण्यात भारतीय संघ यशस्वी ठरेल, असा विश्वासही सेहवागने व्यक्त केला. तो म्हणाला, वर्ल्डकप जेतेपद राखण्यास आम्ही यशस्वी होऊ. आमच्याकडे सर्वोत्तम संघ आहे आणि वन डेत आमची कामगिरीही सर्वोत्तम झाली आहे. वर्ल्डकपपूर्वी होणाऱ्या कसोटी मालिकेचा फायदा संघाला नक्की होईल.(वृत्तसंस्था)
वर्ल्डकप संभाव्य संघात असेन : सेहवाग
By admin | Updated: December 3, 2014 02:14 IST