India Javelin Thrower Sachin Yadav Better Than Neeraj Chopra And Pakistan Arshad Nadeem : जपानमधील टोकिया येथे सुरु असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत सर्वांच्या नजरा या भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रावर खिळल्या होत्या. पॅरिस ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच अर्शद नदीम आणि नीरज चोप्रा या स्पर्धेच्या माध्यमातून समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. पण ना नीरजला जेतेपद कायम ठेवण्यात यश आले ना पाकच्या नदीमला छाप सोडता आली. या दोघांपेक्षा भारताचा भालाफेकपटू सचिन यादवनं फायनलमध्ये मैफिल लुटली. पण त्याचं मेडल थोडक्यात हुकलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिन यादवची पदकाची संधी थोडक्यात हुकली
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत त्रिनबॅगोनियन केशोर्न वॉलकॉट (Keshorn Walcott) याने ८८.१६ मीटर अंतर भाला फेकत सुवर्ण पदकावर कब्जा केला. ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्स (Anderson Peters) याने ८७.३८ मीटर थ्रोसह रौप्य तर अमेरिकेच्या कर्टीस थॉम्पसन (Curtis Thompson) याने ८६.६७ मीटर थ्रोसह कांस्य पदक पटकावले. भारताचा सचिन यादव ८६.२७ मीटरसह चौथ्या क्रमांकावर राहिला.
नीरज चोप्रा पाकिस्तानच्या नदीपपेक्षा भारी ठरला, पण....
गत चॅम्पियन नीरज चोप्रानं सातत्याने ८५ मीटर पेक्षा अधिक भालाफेक करताना दिसले होते. या स्पर्धेतील तो गत चॅम्पियन असल्यामुळे त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. पण कामगिरीत सातत्य राखत सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकण्याची त्याची संधी हुकली आहे. तो यंदाच्या हंगामातील स्पर्धेत ८४.०३ मीटर थ्रोसह आठव्या क्रमांकावर राहिला. पाकिस्तानच्याऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम तर ८२.७५ मीटरवर अडखळत १० व्या क्रमांकवर राहिला.
सचिन यादवची कामगिरी ठरली लक्षवेधी, कारण...
कोरियातील गुमी येथे पार पडलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू सचिन यादव यानं ८५.१६ मीटर थ्रोसह कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. आता वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत त्याने आपल्या वैयक्तिक कामगिरीत आणखी सुधारणा केलीये. पहिल्या दोन्ही प्रयत्नात त्याने ८७.२७ मीटर भाला फेकला. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरलीये. तो नीरज आणि नदीम या दोन स्टारपेक्षा भारी ठरलाय.