इंचियोन : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने शानदार सुरुवात करून दिली; पण भारतीय महिला बॅडमिंटन संघाला त्याचा लाभ घेता आला नाही. १७व्या आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. १९८६ च्या सेऊल आशियाई स्पर्धेनंतर भारताचे बॅडमिंटनमध्ये हे पहिलेच पदक ठरले. त्यावेळी पुरुष संघ कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. भारतीय महिला बॅडमिंटन संघाचे आशियाई स्पर्धेतील हे पहिले पदक आहे. यापूर्वीची सात पदके पुरुषांनी जिंकलेली आहेत. सायनाने कामगिरीत सातत्य राखताना जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सुंग जियहूनचा २१-१२, १०-२१, २१-९ ने पराभव करीत भारताला आघाडी मिळवून दिली. भारताला पी. व्ही. सिंधूकडून चमकदार कामगिरीची आशा होती. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूला तिच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या रियोनजू बायचे आव्हान मोडून काढण्यात अपयश आले. सिंधूला संघर्षपूर्ण लढतीत बायविरुद्ध २१-१४, १८-२१, १३-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. भारताला दुहेरीतील अनुभवी खेळाडूंची उणीव भासली. प्रज्ञा गदरे व एन. सिक्की रेड्डी यांना दुहेरीच्या पहिल्या लढतीत किम सोयोंग व चांग येना यांच्याविरुद्ध १५-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर कोरियाच्या किम ह्योमिनने पी. सी. तुलसीचा २१-१२, २१-१८ ने पराभव करीत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. भारत आणि उपांत्य फेरीत पराभूत झालेला दुसरा संघ जपान कांस्यपदकाचा मानकरी ठरला. (वृत्तसंस्था)
बॅडमिंटनमध्ये महिला संघाला कांस्य
By admin | Updated: September 22, 2014 04:23 IST