बेंगळुरू : पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी संभाव्य संघात निवड झालेला कर्नाटकचा फलंदाज रॉबिन उथप्पा याने अंतिम १५ जणांच्या संघात स्थान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. आपल्याला विश्वचषकात सलामीला फलंदाजी करायला आवडेल, असे तो म्हणाला.‘मला भारताचा सलामीवीर म्हणून खेळायला आवडेल त्यासाठी यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून स्थान मिळाले तरी चालेल,’ असे रॉबिनचे मत आहे. तो म्हणतो, ‘सलामीवीर म्हणून खेळायला आवडेल. यष्टिरक्षक राहिलो तरी फिनिशरची भूमिका निभावायची आहे. मला यष्टिरक्षणासाठी निवडण्यात आले तर अन्य दोन-तीन खेळाडूंसाठी जागा निर्माण होऊ शकते; पण निवडकर्त्यांवर अवलंबून असेल. रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढल्यामुळे मला अंतिम संघात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. वन- डेबाबत विचाराल तर मला माझ्या क्षमतेवर विश्वास असल्याने संधीचा लाभ घेण्यास सज्ज आहे.’७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या रणजी सामन्याचा उपयोग आत्मविश्वास उंचाविण्यासाठी करणार असल्याचे सांगून तो म्हणाला,‘प्रवीण आमरे यांनी माझ्या फलंदाजी तंत्रात थोडा बदल केला आहे. मी आता सरळ बॅटने फटका मारायला शिकलो. शरीराच्या हालचालींमध्येही सुधारणा घडवून आणली आहे.’ (वृत्तसंस्था)
विश्वचषकात सलामीला खेळायची इच्छा : उथप्पा
By admin | Updated: December 5, 2014 08:56 IST