- अनन्या भारद्वाज (मुक्त पत्रकार)५६.४२ मिनिटांत तब्बल २१ किलोमीटर अंतर कोण पळू शकतं? मानवी शरीराला हा वेग गाठणं शक्य तरी आहे का, असा प्रश्न पडलाच तर जेकब किपलिमोचा हा चेहरा पाहा. त्यानं स्पेन मॅरेथॉनमध्ये नुकताच जागतिक विक्रम करताना हाफ मॅरेथॉन फक्त ५६ मिनिटे ४२ सेकंदांत पूर्ण केलं.
जेकबला माध्यमांनी विचारलं की, तू एवढा वेगात कसा काय पळतो? त्यावरचं त्याचं उत्तर अत्यंत साधं आहे. तो म्हणाला, आय टाेल्ड मायसेल्फ आय हॅड टू मेंटेन पेस, नो मॅटर व्हाॅट इट टूक! अनेकांना वाटलं तो काहीतरी मोठी प्रोसेस सांगेल. जेकबच्या दृष्टीने त्याची प्रोसेस एकच आहे, जिंकल्यानंतरही पळत सुटायचं आणि हरलो तरी पळतंच राहायचं !युगांडात शाळेत असल्यापासून तो पळतोय. त्याच्या शाळेत सगळेच पळत. शाळेतली पळण्याची चॅम्पिअनशिप जिंकण्याची इर्षा आणि तयारी इतकी जिद्दीची की ज्याला त्याला वाटे, आपणच चॅम्पिअन व्हावं. जेकब म्हणतो, ‘पळायचं ते चॅम्पिअन होण्यासाठी ही भावना नीट पळता येण्यापूर्वीच मी शिकलो होतो!’
त्याचा मोठा भाऊ पळायचा, म्हणून जेकबही पळायला लागला. डोंगराळ भागात जगणारी ही मुलं. पळणं-दमणं त्यांना नवीन नव्हतं. वयाच्या १५ व्या वर्षी वर्ल्ड माऊंटन रनिंग चॅम्पिअनशिपसाठी तो पात्र ठरला, पण वय नियमांत बसत नसल्यानं त्याला पळण्याची संधी नाकारण्यात आली. तो निराश झाला. इटलीत गेला. तिथं कसाबसा तग धरून राहिला. पळून पैसे कमवत होता, पण २०१७ मध्ये तो युगांडात परत आला. पळण्याचा सराव केला. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. पुढे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दहा हजार किलोमीटर पळून पदक जिंकून आला.
जेकब सांगतो, शाळेत असताना एकच स्वप्न होतं. युरोपात जायचं. युरोपिअन रनर्सना हरवून चॅम्पिअन व्हायचं! बार्सिलोनात जागतिक विक्रम करत त्यानं युराेपिअनच नाही, तर जगातल्या तमाम रनर्सना मागे टाकलं. मानवी क्षमतेच्या पुढचं एक पाऊल टाकलं..