- वसीम अक्रम लिहितो़...द. आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गरचे वक्तव्य बुचकळ्यात टाकणारे आहे. भारतीय उपखंडातील संघ आॅस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा आफ्रिकेचा दौरा करतात, त्यावेळी कुणी प्रश्न उपस्थित करीत नाही. तेथे ‘ग्रीन टॉप’ दिले जाते आणि आमच्या संघांना या खेळपट्ट्यांशी ताळमेळ साधण्याचा सल्ला दिला जातो. पण विदेशी संघ जेव्हा येथे येतात, तेव्हा हे संघ आम्हाला घरच्या स्थितीचा लाभ घेत असल्याची आठवण करून देतात. आम्ही फार मोठी चूक केली, असे भासविले जाते.खूप टर्न होणाऱ्या खेळपट्ट्यांची अपेक्षा मी देखील करीत नाही. पण एक चांगली कसोटी खेळपट्टी हवी. मोहालीत दुसऱ्या दिवशी अशी खेळपट्टी अनुभवायला मिळाली. खेळपट्टी वळण घेणारी असेल तर कसोटीसाठी ते चांगले लक्षण आहे. कारण येथे निकाल मिळतो, अशावेळी टीकाटिप्पणी करण्याऐवजी संघांनी खेळातील तांत्रिक बारकाव्यांवर लक्ष देणे गरजेचे ठरते. केवळ परदेशी संघांनी नव्हे तर स्थानिक संघांनी देखील यावर विचार करावा. इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांनी फिरकीला तोंड देण्याचे कसब आत्मसात करावे तर दुसरीकडे उपखंडातील संघांनीदेखील विदेशातील वेगवान खेळपट्ट्यांवर चांगला खेळ करण्यास शिकायला हवे. खेळपट्टीची तक्रार करण्याची गरजच नाही. हे काही शालेय क्रिकेट नाही. नेहमी चांगला खेळ करण्यावर भर देणे म्हणजेच कसोटी क्रिकेट. खेळपट्टी निकाल देणारी असेल तर उगाच तक्रार करण्यात अर्थ नाही. मोहाली कसोटीविषयी बोलायचे तर आश्विन सामन्याचा हिरो आहे. तो वेगळे काही करण्याचा प्रयत्न करीत नाही. पण त्याला जसे आॅफस्पिन करता येते तसेच तो करतो. त्याचा आत्मविश्वास चांगला असल्याने चेंडूत विविधता राखतो. कॅरमबॉलसारखा त्याचा थेट चेंडू ओळखणे कठीण होऊन जाते. वन डे क्रिकेटमध्ये त्याने अशा चेंडूवर डिव्हिलियर्सची दांडी गूल केली आहे. भारताकडे हरभजनसारखा आणखी एक फिरकी गोलंदाज आहे. मी असतो तर दोन आॅफस्पिनर एकाचवेळी खेळविले नसते. फिरकीचे आदर्श संतुलन साधण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज, आॅफ स्पिनर आणि लेगस्पिनर यांना स्थान दिले असते. मी संघात असताना पाक संघात तीन फिरकी गोलंदाज नव्हतेच. आकिब, वकार आणि मी नवा चेंडू हाताळायचो. मुश्ताक आणि सकलेन फिरकी मारा करायचे. खेळपट्टी फिरकीला अनुकूल नसेल तर आम्ही एकच फिरकी गोलंदाज खेळवायचो. मोहालीची खेळपट्टी मात्र तीन फिरकीपटूंसाठी आदर्श होती. आश्विन सध्या जगातील सर्वोत्कृष्ट आॅफ स्पिनर आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सईद अजमल नियमितपणे खेळत नाही. हे स्थान आश्विनने घेतले. नाथन लियॉनदेखील सुधारणा करीत आहे, पण आश्विनला कामगिरीत सातत्य राखणे जमले. आश्विन पारंपरिक पद्धतीने चेंडू टाकत असल्याने नवा गोलंदाज म्हणून पुढे आला. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात आश्विन स्वत:च्या माऱ्यात किती सातत्य राखतो, हे पाहणे रंजक ठरावे. (टीसीएम)
विदेशी खेळपट्ट्यांवर का आक्षेप नोंदविला जात नाही?
By admin | Updated: November 8, 2015 03:08 IST