ऑनलाइन लोकमत
कोची, दि. ८- सॅम्युअल्सच्या शानदार शतकाच्या जोरावर कोची येथील एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने ४४ षटकांत ३ गडी गमावत २७३ धावा केल्या आहेत. सॅम्युअल्स (नाबाद १०५) व रामदीन (नाबाद ५५) धावांवर खेळत आहेत. भारतातर्फे शमी, जाडेजा व मिश्राने प्रत्येकी १ बळी टिपला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरूवात अडखळत झाली. संघाच्या शंभीर धावा पूर्ण होईपर्यंत त्यांचे दोन गडी बाद झाले. मात्र सॅम्युअल्सच्या खेळीने त्यांचा डाव सावरला. स्मिथ (४६), ड्वेन ब्राव्हो (१७) आणि डॅरेन ब्राव्हो (२८) बाद झाले.
वेस्ट इंडीज संघ पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला आहे. पुढील वर्षी होणा-या विश्वचषकाच्या संघ निवडीसाठी ही मालिका भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. या मालिकेत वर्चस्व राखण्याच्या निर्धाराने भारतीय संघ उतरला आहे. वेस्ट इंडिजच्या संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिल्याने हा सामना रद्द होण्याची शक्यता होती, मात्र आपण हा सामना खेळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.