नागपूर : व्हीसीएवर द. आफ्रिकेला नमवून टी-२० विश्वचषकाची दिमाखात उपांत्य फेरी गाठण्याची वेस्ट इंडिजची इच्छा असल्याचे मत या संघाचा फिरकी गोलंदाज सॅम्युअल बद्री याने बुधवारी व्यक्त केले. सलग दोन सामने जिंकल्यानंतर २५ मार्च रोजी येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मिळविण्याच्या इराद्याने उतरणार असल्याचे बद्रीचे मत होते.सरावांनतर पत्रकारांशी चर्चा करताना बद्री म्हणाला,‘इंग्लंड आणि श्रीलंकेला पराभूत करतेवेळी सर्वच सहकाऱ्यांनी जबाबदारी चोखपणे बजावली. आमचा आत्मविश्वास वाढला असून शुक्रवारी द. आफ्रिकेला धूळ चारू असा विश्वास आहे. आफ्रिका संघात फाफ डू प्लेसिस, ए.बी. डिव्हिलियर्स हे आक्रमक फलंदाज असल्याने विजय सोपा नाही, याची आम्हाला जाणीव आहेच पण मुंबई आणि बंगळुरूच्या तुलनेत व्हीसीएची खेळपट्टी वेगळी असल्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात दर्जेदार कामगिरी करावी लागेल. नागपूरची खेळपट्टी संथ आणि फिरकीपटूंना पूरक असल्याने धावा काढणे आव्हान राहील.’ आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आणि आंद्रे फ्लेचर आपली जबाबदारी महत्त्वाच्या सामन्यात योग्य पद्धतीने सांभाळतील असा विश्वास बद्रीने यावेळी व्यक्त केला. (क्रीडा प्रतिनिधी)
विंडीज उपांत्य फेरीसाठी उत्सुक : बद्री
By admin | Updated: March 24, 2016 01:30 IST