ऑनलाइन लोकमत
रिओ दी जिनेरियो, दि. ५ : साइखोम मीराबाई चानू रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजन गटात उद्या सहभागी होणार असून, तिचे पदक जिंकण्याकडे लक्ष असेल.भारताचा सतीश शिवलिंगम पुरुषांच्या ७७ किलो वजन गटात १0 आॅगस्ट रोजी खेळणार आहे. मीराबाईने जूनमध्ये भारतीय महिलांच्या स्पर्धेत निवड चाचणीत अव्वल राहताना रियोचे तिकीट पक्के केले होते. तिने १९२ किलो वजन उचलताना लंडन आॅलिम्पिकमध्ये महिलांच्या ४८ किलो वजन गटातील कास्यपदकाच्या कामगिरीची बरोबरी केली होती.वेटलिफ्टिंगमध्ये भारताकडून आॅलिम्पिकमध्ये फक्त कर्णम मल्लेश्वरी हिनेच पदक जिंकले आहे. तिने २000 सिडनी आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकले होते.
पतियाळा येथील निवड चाचणीत ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या मीराबाईने राष्ट्रीय विक्रम रचला होता. तिने एकूण १९२ किलो वजन उचलताना कुंजुराणी देवीचा १९0 किलोचा विक्रम मोडला. कुंजुराणी देवी हिने २00४ अॅथेन्स आॅलिम्पिकमध्ये हा विक्रम केला होता. दुसरीकडे सतीशने ७७ किलो वजन गटात ३३६ किलो वजन उचलताना रिओसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती.