शिवाजी गोरे
रिओ दी जानेरो, दि. ७ -रिओ ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४८ किलो वजनी गटात भारताच्या मीरबाई चानूने निराश केले. क्लीन आणि जर्क सेक्शनमध्ये तीन संधींमध्ये चानू एकदाही वजन उचलू शकली नाही. पहिल्या संधीमध्ये चानू १०४ किलो नंतर दोन वेळा १०६ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. क्लीन आणि जर्क सेक्शनमध्ये १०७ किलो वजन उचलण्याची तीची सर्वोत्तम कामगिरी आहे.
सहा संधींपैकी चानूला फक्त एकदाच वजन उचलता आले. स्नॅच फेरीत पहिल्या संधीमध्ये ती ८२ किलो वजन उचलू शकली नाही. त्यानंतर दुस-या राऊंडमध्ये तिने वजन उचलले. तिस-या राऊंडमध्ये चानूला ८४ किलो वजन उचलता आले नाही.
२१ वर्षीय चानू जून महिन्यात पतियाळामध्ये निवड चाचणीच्यावेळी केलेल्या कामगिरीच्या जवळपासही पोहचू शकली नाही. वेटलिफ्टिंगच्या ४८ किलो वजनी गटात थायलंडच्या तानासान सोपिताने सुवर्णपदक जिंकले. तिने एकूण २०० किलो वजन उचलले. इंडोनेशियाच्या ऑगस्टीयानी वाहयुनीने रौप्य आणि जापानच्या मियाके हिरोमीने कास्यपदक पटकावले.