मुंबई : देशातील खास स्कूटरप्रेमींसाठी आयोजित होणाऱ्या एकमेव ‘मान्सून स्कूटर रॅली’ स्पर्धा ८ व ९ आॅगस्टला नवी मुंबई येथे होणार आहे. यंदाचे २६वे वर्ष असलेल्या या अनोख्या रॅली स्पर्धेत स्कूटरप्रेमींना थरारक अनुभव घेण्याची संधी मिळेल. नवी मुंबई येथील बेलापूर येथे होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील अव्वल खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला असून केवळ ४५ खेळाडूंच्या प्रवेशासाठी मर्यादित असलेल्या या रॅलीमध्ये आतापर्यंत ३५ अव्वल खेळाडुंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये मुंबईसह, पुणे, नाशिक, भोपाळ व बंगळुरु येथील खेळाडूंचा सहभाग आहे. एकूण २५ किमी अंतराची असलेली ही स्पर्धा दोन दिवसांच्या कालावधीत पार पडणार असून या मार्गामध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यातून आणि चिखलातून खेळाडूंना मोठी मार्ग पुर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. दरम्यान, दरवर्षी रॅली थरारक व रोमांचक करण्याचा प्रयत्नात असलेल्या आयोजकांनी यावर्षी देखील स्पर्धकांना २५ किमी अंतराचा मार्ग पार करण्यासाठी वेग आणि स्कूटरचे संतुलन यामध्ये समतोल राखण्याचे आव्हान असेल, असे स्पष्ट केले.एकूण ७५ हजार रुपयांची रोख पारितोषिक असलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना ‘बेस्ट परफॉर्मन्स’चे पारितोषिक पटकावण्याची संधी असेल. बंगळुरुचा गतविजेता आर. नटराज आणि मुजफ्फर अली (भोपाळ) यांच्यासह मनजितसिंग बस्सान (मुंबई - २००२, २००५, २००७, २००८) आणि शमीम खान (नाशिक - २००३, २००४, २०१०, २०१२) या माजी विजेत्यांव्यतिरीक्त कुणाल राव, अवतार सिंग या अव्वल स्पर्धकांच्या समावेशामुळे या रॅलीची चुरस शिगेला पोहचली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
‘मान्सून स्कुटर रॅली’चा थरार
By admin | Updated: July 31, 2015 03:16 IST