रोहित नाईक,मुंबई- ‘‘डोपिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर जागतिक कुस्ती संघटनेनेही आॅलिम्पिक प्रवेशासाठी परवानगी दिल्यानंतर नरसिंग यादव ‘टेन्शन फ्री’ झाला असून त्याचा जोमाने सराव सुरू आहे,’’ अशा शब्दांत नरसिंगचे प्रशिक्षक जगमल सिंग यांनी प्रतिक्रिया दिली. आॅलिम्पिकच्या तयारीसाठी नरसिंग सध्या कांदिवलीतील भारतीय क्रीडा प्रधिकारणामध्ये (साई) सराव करीत असून त्याच्या तयारीबाबत जगमल यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. शिवाय सरावावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला प्रसारमाध्यमांपासून ८-१० दिवस दूर राहण्याची ताकीदही मिळाली असल्याचे जगमल यांनी सांगितले.जगमल यांनी सांगितले, ‘‘नरसिंगला जागतिक कुस्ती संघटनेकडून परवानगी मिळाली असली, तरी रिओला जाण्याची तारीख अजून ठरलेली नाही. अजूनही राष्ट्रीय संघटनेकडून दिल्लीला बोलावणे आलेले नसल्याने, तोपर्यंत नरसिंग कांदिवलीमध्येच सराव करेल. घरचे केंद्र असल्याने येथे नरसिंगला सरावासाठी कोणतीही अडचण येत नाही. शिवाय त्याला कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यापासून आणि कोणालाही भेटण्यापासून मनाई करण्यात आली आहे.’’‘‘नरसिंगवरील सर्व दबाव आता निघून गेला असून तो टेन्शन फ्री आहे. त्यामुळेच त्याचे आता सर्व लक्ष सरावावर केंद्रित झाले आहे. दिवसातून दोन वेळा कसून सराव करीत असून पौष्टिक आहार घेत आहे. सध्या तो मानसिकरीत्या तणावमुक्त आहे. त्यामुळेच १९ आॅगस्टला रिओमध्ये होणाऱ्या फाईटमध्ये तो चांगली लढत देईल आणि एकूणच देशासाठी नक्कीच पदक घेऊन येईल,’’ असा विश्वासही जगमल यांनी या वेळी व्यक्त केला. सुशील दररोज दिवसातून दोन वेळा सकाळी व संध्याकाळी तीन ते साडेतीन तासांचा सराव करतो. यामध्ये कधी कधी वेळेत बदलही होतो, अशी माहितीही जगमल यांनी दिली.>सुशीलकुमारने दिलेल्या शुभेच्छांबाबत नरसिंगने अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण कोणीही शुभेच्छा देणे चांगली बाब असते. देशाला पदक मिळवून देण्यासाठी सुशीलने शुभेच्छा दिल्या आहेत आणि नरसिंग यामध्ये नक्कीच यशस्वी होईल.- जगमल सिंग
नरसिंगवर दबाव नाही...
By admin | Updated: August 4, 2016 03:59 IST