ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - भारतीय संघातील अनुभवी फलंदाज सुरेश रैना आता नवीन भूमिकेत दिसणार आहे. एका हिंदी चित्रपटासाठी सुरेश रैना गाणं गाणार असून या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी सुरेश रैना सध्या मुंबईत मुक्काम ठोकून आहे.
सुरेश रैनाचा मित्र व गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाचा सह पटकथाकार झिशान कादरी 'मेरठिया गँगस्टर' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. झिशानचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असून आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटातील एक गाणे सुरेश रैनाने गावे असे झिशानला वाटत होते. अखेरीस झिशानने सुरेश रैनाची यासाठी तयार केले आहे. सुरेश गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी मुंबईत आला आहे. 'हिंदी चित्रपटासाठी गाणं गायला मिळाले असून यासाठी मी उत्साहित आहे, मी पहिल्यांदाच असं काही तरी करतोय' अशी प्रतिक्रिया सुरेशने प्रसारमाध्यमांना दिली. या चित्रपटाचे संगीत लवकरच प्रदर्शित होईल असे सूत्रांनी सांगितले.