चेन्नई : सुरेश रैनाचे अर्धशतक, आशिष नेहराचा भेदक मारा आणि क्षेत्ररक्षणाची मिळालेली अप्रतिम जोड या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएल-८ मध्ये सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुवर २४ धावांनी विजय नोंदवीत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले.या विजयामुळे चेन्नईचे दहा सामन्यांत १४ गुण झाले असून, हा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आरसीबीचा नऊ सामन्यांतील हा चौथा पराभव होता. त्यांचे केवळ नऊ गुण आहेत.चेन्नईने अपेक्षेपेक्षा कमी धावा नोंदविल्यानंतरही डावपेचांच्या बळावर आरसीबीला मागे टाकले. चेन्नईने प्रथम फलंदाजी करीत ९ बाद १४८ पर्यंत मजल गाठली होती. सुरेश रैनाने ४८ धावा, तर धोनीने २९ धावा फटकावल्या. आरसीबी संघ फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले. विराट कोहलीने एक टोक सांभाळून ४८ धावा केल्या तेव्हा आरसीबी जिंकेल, असे वाटत होते. पण अखेरचे सात गडी २७ धावांत गमवून या संघाने स्वत:वर संकट ओढवून घेतले. आरसीबीचा डाव १९.४ षटकांत १२४ धावांत संपुष्टात आला. आशिष नेहराने १९ धावांत तीन, ड्वेन ब्राव्होने दोन आणि ईश्वर पांडे याने २८ धावांत दोन गडी बाद केले. त्याआधी, आॅस्ट्रेलियन स्टार मिशेल स्टार्कच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्सच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत चेन्नई सुपरकिंग्सचा डाव ९ बाद १४८ धावांत रोखला. मिशेल स्टार्कने २४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. हर्षल पटेल (२-१९) व डेव्हिड वीज (२-२९) यांची त्याला योग्य साथ लाभली. चेन्नईतर्फे सुरेश रैनाने ४६ चेंडूंना सामोरे जाताना ५२ धावांची खेळी केली, तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने २९ धावा फटकावल्या. जवळजवळ ४५ डिग्री तापमान असताना धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. स्टार्कने पहिल्याच षटकात ड्वेन स्मिथला माघारी परतवत बेंगळुरू संघाला पहिले यश मिळवून दिले. ब्रेन्डन मॅक्युलम (२०) यालाही मोठी खेळी करता आली नाही. चेन्नईला पॉवर प्लेमध्ये केवळ ३७ धावा वसूल करता आल्या. डावातील नवव्या षटकात १५ धावा फटकावल्या गेल्या. रैनाने ४४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याने फॅफ ड्यू प्लेसिससोबत (२४) तिसऱ्या विकेटसाठी ५२ चेंडूंमध्ये ६४ धावांची भागीदारी केली. हर्षलने आपल्या तिसऱ्या षटकात या दोघांना माघारी परतवले. १५ षटकांनंतर चेन्नईची ४ बाद १०१ अशी स्थिती होती. धोनीने आक्रमक फलंदाजी केली, तर जडेजाची (३) निराशाजनक कामगिरी कायम राहिली. धोनीचा अडसर वीजने दूर केला, तर स्टार्कने डावाच्या अखेरच्या षटकात ड्वेन ब्राव्हो (२) व पवन नेगी (१३) यांना बाद केले. (वृत्तसंस्था)
सुपरकिंग्ज अव्वल स्थानी
By admin | Updated: May 5, 2015 00:58 IST