मुंबई : मुंबईकर सुप्रिया जोशी (इलो १९८४) हिने नवव्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेची खळबळजनक सुरुवात करताना पहिल्याच दिवशी आठव्या मानांकित विष्णू प्रसन्ना (तामिळनाडू) याला पराभवाचा धक्का दिला. त्याचवेळी रशियाच्या अग्रमानांकित पोपोव इवान (इलो २६४८) याने सहज विजयी सलामी देताना महाराष्ट्राच्या संकर्षा शेलकेला नमवले.अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे येथील माउंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत १२ देशांतील १७५ बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला आहे. सुप्रियाने धक्कादायक सुरुवात करताना इंडियन डिफेन्स पद्धतीने बचावात्मक पवित्रा घेतला. सुप्रियाने प्रतिस्पर्धी राजाला संरक्षण करणाऱ्या प्याद्याला हलविण्यासाठी आपल्या घोड्याचा बळी दिला. यानंतर मिळालेल्या संधीचा फायदा घेत सुप्रियाने विष्णूच्या राजावर हल्ला चढवून २९ चालींमध्ये बाजी मारली.त्याचवेळी टॉप बोर्डवर झालेल्या रोमांचक लढतीत अव्वल खेळाडू पोपोवने आपला दर्जा सिद्ध करताना संकर्षाला ५२ चालींमध्ये नमवले. सफेद मोहऱ्यांनी खेळताना संकर्षाला सिसिलियन बचावास सामोरे जावे लागले. लढत समान स्थितीत असताना संकर्षाने २२वी चाल चुकीची खेळली आणि तिथेच सामना फिरला. प्याद्याला संरक्षण देण्यासाठी घोडा हलविल्याने पोपोवला राजावर प्याद्याच्या साहाय्याने आक्रमण करण्याची संधी मिळाली. यानंतर पोपोवने संकर्षाला ५२व्या चालीमध्ये पराभूत केले. (क्रीडा प्रतिनिधी)
सुप्रियाचा ग्रँडमास्टर विष्णूला धक्का
By admin | Updated: June 3, 2016 03:36 IST