हैदराबाद : आत्मविश्वास दुणावलेला सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल-८ मध्ये शुक्रवारी महत्त्वाच्या लढतीत ‘प्ले आॅफ’साठी चढाओढ करणार आहेत.डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादने सलग तीन सामने जिंकून प्ले आॅफसाठी दावा भक्कम केला. दुसरीकडे आरसीबीचा बुधवारी पावसाच्या व्यत्ययात झालेल्या दहा षटकांच्या सामन्यात किंग्स पंजाबने २२ धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही आरसीबी १२ पैकी सहा सामने जिंकून प्ले आॅफच्या दौडीत कायम आहे. सात विजय आणि पाच पराभवानंतर हैदराबादने मागच्या आठवड्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध घरच्या मैदानावर चक्क २०१ धावा उभारल्या. कर्णधार आणि आॅरेंज कॅपचा मानकरी डेव्हिड वॉर्नरने १२ सामन्यात सर्वाधिक ५०४, शिखर धवन, मोझेस हेन्रिक्स आणि इयॉन मोर्गन यांनीही पाठोपाठ धावा केल्या. आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू हेन्रिक्सने डेअरडेव्हिल्सविरुद्ध ७४ धावा ठोकल्या तर किंग्स पंजाबविरुद्ध १६ धावा देत तीन गडी बाद केले होते. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट याला भुवनेश्वर कुमारची चांगली साथ लाभली. एकूणच सनरायझर्स स्पर्धेत ‘छुपा रुस्तम’ सिद्ध झाला.आरसीबीला देखील कमकुवत मानता येणार नाही. ख्रिस गेलसारखा धोकादायक फलंदाज याच संघात आहे. डिव्हिलियर्स आणि विराट कोहली सोबतीला आहेतच. डिव्हिलियर्सने याच आठवड्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद १३३ धावा ठोकल्या होत्या. त्याच्या खेळीमुळे बेंगळुरुने स्पर्धेतील सर्वोच्च २३५ धावांची नोंद केली. उभय संघात आतापर्यंत झालेल्या सामन्यात सनरायझर्सने तीन तर बेंगळुरूने दोनवेळा विजय नोंदविला. (वृत्तसंस्था)
सनरायझर्स- चॅलेंजर्स झुंजणार
By admin | Updated: May 15, 2015 01:11 IST