हैदराबाद : अत्यंत थरारक झालेल्या अंतिम सामन्यात स्टॉर्म क्वीन्स संघाने मोक्याच्यावेळी बाजी मारत फायर बडर््स संघाला २४-२३ असे नमवून पहिल्या प्रो कबड्डी महिला चॅलेंज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. येथील गाचीबावली स्टेडियममध्ये चुरशीच्या रंगलेल्या सामन्यात स्टॉर्म क्वीन्सने अंतिम क्षणी अखेरच्या ३० सेकंदातील चढाईमध्ये निर्णायक गुण मिळवताना जेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे अखेरच्या दीड मिनिटांमध्ये स्टॉर्म संघाने २२-२० अशी आघाडी होती. मात्र रिजूने केलेल्या अप्रतिम चढाईमुळे फायर बडर््सने ३ गुणांची कमाई करीत स्टार्म संघावर लोण चढवला.या जबरदस्त धक्क्यानंतर चवताळलेल्या स्टॉर्म संघाने आक्रमक पुनरागमन केले आणि कर्णधार तेजस्विनी बाईने अखेरच्या ३० सेकंदातील चढाईमध्ये २ गुणांची कमाई करून एका गुणाच्या फरकाने जेतेपेदाला गवसणी घातली. मध्यंतराला फायर बडर््स १०-८ असे आघाडीवर होते. मात्र ही आघाडी कायम राखण्यात त्यांना अपयश आले. त्याचवेळी पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पुणेरी पलटणने झुंजार तेलगू टायटन्सचे आव्हान ४०-३५ असे परतावून सलग दुसऱ्यांदा तिसरे स्थान पटकावले. (वृत्तसंस्था)
स्टॉर्म क्वीन्स पहिल्या महिला ‘चॅम्पियन’
By admin | Updated: August 1, 2016 05:38 IST