नवी दिल्ली : दिल्ली येथे जवळपास ७० हजार खेळाडू येथे २३ ते ३0 आॅक्टोबरदरम्यान विविध स्थळी होणाऱ्या राज्यस्तरीय दिल्ली आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन तालकटोरा स्टेडियममध्ये केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद यांच्या हस्ते होणार आहे.या स्पर्धेचे आयोजन तब्बल २0 वर्षांनंतर होत आहे; परंतु दिल्ली आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कुलदीप वत्स यांनी आता ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.वत्स यांनी म्हटले, ‘‘याआधी १९९५ मध्ये दिल्ली आॅलिम्पिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आता २0 वर्षांनंतर आम्ही मोठ्या स्तरावर आयोजन करीत आहोत; परंतु आता ही स्पर्धा प्रत्येक वर्षी घेण्यात येईल असे आश्वासन देतो.’’आम्हाला दिल्ली सरकारचा पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी पदकविजेत्या खेळाडूंना एकूण ९0 लाख ते एक कोटी रुपये पुरस्कार राशी प्रदान करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे समारोपास मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही वत्स म्हणाले.दिल्लीच्या या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, कुस्ती, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, तिरंदाजीसह एकूण २८ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेचे आयोजन तालकटोरा स्टेडियम, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, त्यागराज स्टेडियम, राजीव गांधी स्टेडियम, छत्रसाल स्टेडियम, वायएमसीए, श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, मॉडर्न स्कूल येथे होणार आहे. या प्रसंगी दिल्लीतील अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)
दिल्लीत २0 वर्षांनंतर राज्यस्तरीय स्पर्धा
By admin | Updated: October 22, 2015 00:49 IST