आलूर : चंदना देसप्रियाच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर श्रीलंकाने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने पराभव केला. लंकेपुढे उपांत्य सामन्यात यजमान भारताचे तगडे आव्हान असेल. त्याचवेळी, पाकिस्तान आणि इंग्लंड अन्य उपांत्य सामन्यात आमनेसामने येतील.कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आफ्रिकेचा पहिला डाव निर्धारित २० षटकांत ४ बाद १७८ असा रोखला. डेव्हिड लँड्री (४०), बुहल भिडला (५९) आणि जोहान स्कोरेदर (५०) यांनी संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. यानंतर, आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने आक्रमक फटकेबाजी करून १२.२ षटकांतच एका फलंदाजाच्या मोबदल्यात १७९ धावा काढून दणदणीत विजय मिळविला. चंदनाने निर्णायक कामगिरी करताना ४७ चेंडंूत १८ चौकारांसह नाबाद १०९ धावांचा तडाखा दिला. अन्य सामन्यात पाकने १४७ धावांनी जबरदस्त बाजी मारताना आॅस्टे्रलियाचा फडशा पाडला, तर इंग्लंडने विंडीजचा ६ विकेट्सने पराभव करून उपांत्य फेरी गाठली. (वृत्तसंस्था)
श्रीलंका उपांत्य फेरीत
By admin | Updated: February 10, 2017 02:16 IST