होबार्ट : खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला श्रीलंका संघ विश्वकप स्पर्धेत ‘अ’ गटात बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत कमकुवत स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळविण्यास उत्सुक आहे. अष्टपैलू जीवन मेंडिस, फलंदाज दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चंदीमल या श्रीलंकेच्या खेळाडूंना दुखापतीमुळे विश्वकप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळवून श्रीलंका संघ गटात तिसरे स्थान पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे.अँजेलो मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने आतापर्यंत पाचपैकी ३ सामन्यांत विजय मिळविला आहे. काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे फलंदाजीमध्ये श्रीलंका संघाच्या चिंतेत भर पडली आहे. बाद फेरीत अंतिम संघाची निवड करताना श्रीलंका संघाला अडचण भासण्याची शक्यता आहे. चंदीमलने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २४ चेंडूंमध्ये ५२ धावा फटकावल्या; पण स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला मायदेशी परतावे लागले. दुखापतग्रस्त खेळाडूंच्या स्थानी दुसऱ्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. १९९६च्या चॅम्पियन श्रीलंका संघाची दारोमदार आता या बदली खेळाडूंच्या कामगिरीवर आहे. श्रीलंका संघ पेस्टन मोमसेनच्या नेतृत्वाखालील स्कॉटलंड संघाविरुद्ध प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे. स्पर्धेत यापूर्वी चारही सामने गमावणारा स्कॉटलंड संघ गटात तळाच्या स्थानावर आहे. श्रीलंका संघ यापूर्वी स्कॉटलंडविरुद्ध केवळ एक वन-डे सामना खेळलेला आहे. २०११च्या जुलै महिन्यात खेळल्या गेलेल्या या एकमेव सामन्यात श्रीलंका संघाने १८३ धावांनी विजय मिळविला होता. श्रीलंका संघ पुन्हा एकदा मोठ्या फरकाने विजय मिळविण्यास उत्सुक आहे. फिरकीपटू रंगना हेराथ आणि सलामीवीर लाहिरू थिरिमाने दुखापतीतून सावरत आहेत. थिरिमाने या लढतीत खेळणार नसल्याचे अटापटू यांनी सांगितले. १८ मार्च रोजी सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्याला खेळायचे आहे, असेही अटापटू म्हणाले. अटापटू पुढे म्हणाले, ‘‘खेळाडू दुखापतग्रस्त व्हावा, असे कुठल्याच संघाला वाटत नाही. ही स्थिती आमच्यासाठी चांगली नाही; पण अन्य खेळाडू चांगली कामगिरी करतील, अशी आशा आहे. सर्वच खेळाडू खेळण्यासाठी सज्ज आहेत; पण कुणाला विश्रांती द्यायची, याबाबत आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही.’’स्कॉटलंड संघाला पुन्हा एकदा कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. स्कॉटलंडच्या फलंदाजांना लसिथ मलिंगा व सहकाऱ्यांचे आव्हान पेलावे लागणार आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांना या स्पर्धेत अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. (वृत्तसंस्था)
श्रीलंका कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक
By admin | Updated: March 11, 2015 00:44 IST