नवी दिल्ली : भारताचा नंबर वनचा एकेरीचा खेळाडू सोमदेव देवबर्मन ताजा जाहीर एटीपी रँकिंगमध्ये दोन स्थानांच्या सुधारणेसह ९३व्या स्थानावर पोहोचला, तर दुहेरीचा खेळाडू रोहन बोपन्ना ३ स्थानांनी घसरून १७व्या स्थानावर पोहोचला़ सोमदेवने सध्या कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही; मात्र त्याच्या रँकिंगमध्ये सातत्याने सुधारणा झाली. गत आठवड्यामध्येदेखील त्याच्या रँकिंगमध्ये २ स्थानांची सुधारणा झाली होती़ त्याची सर्वश्रेष्ठ रँकिंग ६२ होती़ ही रँकिंग त्याने जुलै २०११मध्ये मिळविली होती़ मात्र, युकी भांबरीच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण झाली आहे आणि तो आता १५७व्या क्रमांकावर पोहोचला आहे़ एकेरी रँकिंगमध्ये स्पेनचा राफेल नदाल रोम मास्टर्सच्या अंतिम फेरीमधील पराभवानंतरदेखील पहिल्या क्रमांकावर कायम आहे़ तर, त्याला पराभूत करणारा सर्बियाचा नोवाक जोकोवीच दुसर्या क्रमांकावर आहे़ आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्वित्झर्लंडचा स्टेनिस्लास वावरिन्का तिसरा, त्याच्याच देशाचा रॉजर फेडरर चौथ्या आणि स्पेनचा डेव्हिड फेरर पाचव्या स्थानावर आहेत़ दुहेरी रँकिंगमध्ये भारताचा लिएंडर पेस ११व्या स्थानावर कायम आहे़ मात्र बोपन्ना ३ स्थानांच्या घसरणीसह १७व्या स्थानावर आला आहे़ (वृत्तसंस्था)
सोमदेवची दोन स्थानांनी सुधारणा
By admin | Updated: May 20, 2014 03:27 IST