सोल : सायना नेहवालच्या अनुपस्थितीत कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूने महिलांच्या गटात विजयी सलामी दिली. सिंधूने खळबळजनक निकाल नोंदवताना तृतीय मानांकित थायलंडच्या रत्वानोक इंतानोनला धक्का दिला. पुरुष गटात भारताचा पारुपल्ली कश्यपला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.सिंधूने आपल्या लौकिकानुसार खेळ करीत भारताच्या आशा उंचावल्या. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन वेळची कांस्यपदक विजेती सिंधूने चुरशीच्या सामन्यात झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना इंतानोनला २१-१९, २१-२३, २१-१३ असा धक्का दिला. पहिल्या सेटमध्ये १८-१८ अशी बरोबरी झाल्यानंतर सिंधूने मोक्याच्यावेळी गुण मिळवत आघाडी घेतली. यानंतर इंतानोनने सिंधूला चांगलेच झुंजवले. निर्णायक सेटमध्ये लढत गेल्यानंतर सिंधूने इंतानोनला डोके वर काढण्याची संधी न देता बाजी मारली. पुरुषांच्या गटात मात्र भारताल पहिल्याच फेरीत मोठा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरील कश्यपला हाँगकाँगच्या वेई नान विरुद्ध २१-१७, १६-२१, १८-२१ पराभव पत्करावा लागला. एक तासपर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात पहिला सेट जिंकल्यानंतरही कश्यपला खेळ उंचावण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)
सिंधूची विजयी सलामी
By admin | Updated: September 17, 2015 01:04 IST