वुहान : धावपटू मचेरिता राजू पूवम्मा आणि हेप्टाथलानपटू लिक्सी जोसफ यांनी गुरुवारी २१ व्या आशियाई अॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी रौप्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारताने चार पदके पटकावली. २०१३ मध्येही या स्पर्धेत पूवम्माने भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. महिलांच्या ४०० मीटरमध्ये पूवम्माने ५३.०७ सकेंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. चीनची यांग हुइंजहेने ५२.३७ सेकंद वेळेसह शर्यत पूर्ण करताना सुवर्णपदक पटकावले. कजाखस्तानच्या अनास्तेशिया कुदिनोव्हाने कांस्यपदकाचा मान मिळवला. पहिल्या दिवशी सहाव्या स्थानावर असलेल्या जोसेफने ६.१९ मीटरचे अंतर गाठताना तिसरे स्थानावर झेप घेतली. भाला फेकमध्ये तिला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण ८०० मीटर दौड स्पर्धेत तिने अव्वल स्थान पटकावले. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना जोसेफने ५५५४ गुणांची कमाई करीत रौप्यपदकाचा मान मिळवला. माजी आशियाई ज्युनिअर चॅम्पियन पोर्णिमा हेंब्रमने ५५११ गुणांसह कांस्यपदक पटकावले. जी. लक्ष्मणनने ५ हजार मीटर दौड स्पर्धेत कांस्यपदकाचा मान मिळवला. दुती चंद, श्रावणी नंदा, जी.एम. पद्मिनी व सिनी सहदेवन यांचा समावेश असलेल्या महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले संघाला ४५.७२ सेकंद वेळसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांचा ४ बाय १०० मीटर रिले संघ ३९.६७ सेकंद वेळेसह सहाव्या स्थानावर राहिला. पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत अंकित शर्मा (७.७६ मीटर) व कुमारावेल प्रेमकुमार (७.६९ मीटर) यांना अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या खात्यावर आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची नोंद आहे. पुरुषांच्या ४०० मीटर दौड स्पर्धेत आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आरोकया राजीव (४६.६५ सेकंद) सातव्या स्थानी राहिला. कतारच्या युवा अब्दलेलाह हारुनने ४४.६८ सेकंद वेळेसह सुवर्णपदकाचा मान मिळवला. अन्य स्पर्धांमध्ये अनू राघवन महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५९.२८ सेकंद वेळसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. दुसऱ्या हिटमध्ये तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. युथ आॅलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा दुर्गेश कुमार पाल पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत बाहेर झाला. बहुप्रतिक्षित १०० मीटर दौड स्पर्धेत नायजेरियामध्ये जन्मलेला कतारच्या फेरी ओनुनोडेने ९.९१ सेकंद वेळेसह सुवर्णपदकाचा मान मिळवला. त्याने चीनचा झांग पेइमेंग (१०.१५ सेकंद) व इराणचा रेजा घाजेमी (१०.१९ सेकंद) यांना पिछाडीवर सोडले. जपानच्या चिशातो फुकुशिमाने ११.२३ सेकंद वेळेसह महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. भारताची श्रावणी नंदा ११.४८ सेकंद वेळेसह पाचव्या स्थानी राहिली. (वृत्तसंस्था)
पूवम्मा, जोसेफ यांना रौप्य
By admin | Updated: June 5, 2015 01:04 IST