राज चिंचणकर,
मुंबई- रंगभूमीवर एखादा कलावंत भूमिका करण्यासाठी उभा राहिला आणि अचानक काही संकट उद्भवले तरी तो रंगभूमीकडे पाठ फिरवत नाही. नाट्यक्षेत्रात अशी काही उदाहरणे आहेत आणि त्यातच आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याची भर पडली आहे. ऐन रंगात आलेल्या नाटकाच्या प्रयोगात भूमिका करताना अपघाताने त्याचे चक्क कपाळ फुटले आणि रक्ताचा प्रवाह वाहत असतानाही त्याने मायबाप रसिकांना पाठ दाखवली नाही, याचे प्रत्यंतर अलीकडेच नाट्यरसिकांना आले.सिद्धार्थ सध्या ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकात भूमिका करत आहे आणि यशवंत नाट्यगृहात रविवारी या नाटकाचा प्रयोग रंगत चालला होता. एका प्रवेशानंतर विंगेत एक्झिट घेताना काळोखात सिद्धार्थ धडपडला आणि थेट त्याचे कपाळ फुटले. आणीबाणीचा प्रसंग होता तो, कारण त्या एक्झिटनंतर लगेचच त्याची पुन्हा एन्ट्री होती. पण कपाळातून रक्ताची धार लागलेल्या स्थितीतही सिद्धार्थने ‘तळ्याकाठी मग्न’ झालेला प्रवेश अभिनेता चिन्मय मांडलेकर सोबत निभावून नेला. या प्रवेशानंतर ब्लॅक आऊट होताच त्याने तडक मेकअप रूम गाठली आणि तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र या अवधीत सिद्धार्थच्या कपाळातून होणारा रक्तस्त्राव वाढल्याने, या नाटकात त्याचा सहकारी असलेला अभिनेता प्रसाद ओक याने रसिकांसमोर येत परिस्थितीची कल्पना दिली आणि पाच मिनिटांचा वेळ मागून घेत पडदा पाडला. पण या काळात एकही रसिक जागेवरून उठला नाही. काही क्षणातच पडदा वर गेला आणि कपाळावर पट्टी बांधलेल्या सिद्धार्थने पुन्हा रंगभूमीवर एन्ट्री घेतली. काही झालेच नाही अशा थाटात तो त्याच्या भूमिकेत शिरला आणि या निमित्ताने रंगभूमीवर सध्याच्या काळातले ‘शो मस्ट गो आॅन’चे उदाहरण सिद्धार्थने कायम केले.