नवी दिल्ली : बीसीसीआयने मला सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला. या वयात माझ्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा नसेलही, पण महिला क्रिकेटला यामुळे उत्तुंग झेप घेणे शक्य होईल, असा आशावाद भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी व्यक्त केला.बीसीसीआयकडून माझा सन्मान होणे हे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही, पण महिला क्रिकेटसाठी मोठा सन्मान आहे. काल पुरस्कार जाहीर होताच मला आश्चर्याचा धक्का बसला. बीसीसीआयकडून ८ मार्च रोजी बंगळुरू येथे या पुरस्कारांचे वितरण होईल तेव्हा हा पुरस्कार स्वीकारणारी मी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरणार आहे.’ भारतीय महिला क्रिकेट संघाचा अशा प्रकारचा हा पहिलाच गौरव आहे. २००६ मध्ये बीसीसीआयने महिला क्रिकेटचे पालकत्व स्वीकारल्यापासून लक्षणीय बदल घडून आले. रंगास्वामी यांच्या मते बरेच काही व्हायचे अद्याप शिल्लक आहे. आम्ही महिला खेळाडू अनेक दिवस रेल्वेत प्रवास करीत राहिलो. प्रशासकांचे आमच्याप्रती उदासीन धोरण होते. तरीही भविष्याची भक्कम पायाभरणी करण्यात यशस्वी ठरलो. माझ्या उमेदीच्या काळात भारतासाठी खेळू न शकल्याची मला खंत आहे. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. त्या म्हणाल्या, ‘१९७७ आणि १९८४ या काळात एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नव्हता. त्याचप्रकारे १९८६ ते १९९१ या काळातही सामने खेळले गेले नाहीत. त्यामुळेच २२ वर्षांच्या कारकिर्दीत १२ वर्षे देखील खेळण्याची संधी मला मिळाली नाही.’(वृत्तसंस्था)
महिला क्रिकेटसाठी उत्तुंग झेप : शांता रंगास्वामी
By admin | Updated: March 1, 2017 00:11 IST