नवी दिल्ली : गेल्या महिन्यात झालेल्या विश्व अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्र्धेतील कांस्य पदकविजेत्या भारताच्या शिव थापा याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय मुष्टियोद्धा ठरला आहे. थापा याने ५६ किलो वजनीगटात १५५० गुणांसह दुसरे स्थान पटकाविले आहे. याच गटात विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकविजेता आयर्लंडचा मायकल कोनलान २१५० अंकांसह अव्वलस्थानी आहे. भारताचा हा बावीस वर्षीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंह (२००९, कांस्य), विकास कृष्ण (२०११, कांस्य) यांच्या नंतर अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय आहे. दोहा स्पर्धेच्या उपांत्यफेरीत पराभूत झालेला विकास ७५ किलो मिडलवेट गटात सहाव्या स्थानी, तर ९१ किलो वजनीगटाच्या सुपर हेवीवेट गटातील सतीश कुमार सातव्या स्थानी आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्य पदकविजेता देवेंद्रो सिंह ४९ किलो वजनीगटात १३ व्या स्थानी आहे. त्याच्या खात्यात ५५० गुण जमा आहेत. सुमित सांगवान ८१ किलो वजनीगटात साडेचारशे गुणांसह १८व्या, तर मनोज कुमार ६४ किलो वजनीगटात १८ व्या स्थानी आहे. विश्व सिरीज मुक्केबाजी स्पर्धेत चांगली खेळी करणारा गौरव विधुडी ५२ किलो वजनीगटात ३७ व्या, तर आशियाई रौप्य विजेता मनदीप जांगडा ६९ किलो गटात ५८व्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)
शिव थापा जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी
By admin | Updated: November 4, 2015 01:25 IST