मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आज रविवारी होणाऱ्या बैठकीत माजी अध्यक्ष अॅड. शशांक मनोहर सर्वसंमतीने पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. या बैठकीला वादग्रस्त माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन उपस्थित राहणार नसल्याचे कळते.श्रीनिवासन यांनी मागील बैठकीत तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रमुख या नात्याने भाग घेतला होता. या बैठकीला मात्र टीएनसीएचे उपाध्यक्ष पी. एस. रमण हे संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने हजेरी लावतील. श्रीनिवासन यांची अनुपस्थिती त्यांच्या गटाच्या माघारीचे संकेत आहेत. शिवाय श्रीनिवासन स्वत: बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत स्वत:ला सहभागी करून घेण्यास इच्छुक नाहीत, हे निश्चित झाले. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी अलीकडे मनोहर हेच सर्वसंमतीने एकमेव उमेदवार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.श्रीनिवासन यांच्या गटाच्या अंतर्गत सूत्रानुसार श्रीनिवासन बीसीसीआयच्या कामापासून स्वत:ला दूर ठेवू इच्छितात. २०१७ पर्यंत कितीही प्रयत्न केला तरी आपली डाळ शिजणार नाही हे त्यांना कळून चुकले आहे. सध्या ते सिमेंट व्यवसायावर लक्ष केंद्रित करू इच्छितात. आठवडाभराआधी श्रीनिवासन माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अध्यक्षपदासाठी तडजोड करीत होते. गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीकडे श्रीनिवासन यांचा डोळा लागला होता. शाह यांचा पाठिंबा मिळाल्यास आपण अध्यक्ष बनू शकतो, अशी त्यांना आशा होती. पण मनोहर यांना जो राजकीय पाठिंबा मिळाला त्यावरून मनोहर हेच अध्यक्ष बनू शकतात हे स्पष्ट झाले. श्रीनिवासन यांची शाह यांच्याशी भेट होऊ न शकल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. आयसीसी चेअरमन असलेले श्रीनिवासन यांनी ठाकूर यांच्यावर सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिल्याचा आरोप करीत याचिका दाखल केली आहे. यावर सोमवारी सुनावणी होईल. याशिवाय बीसीसीआयच्या मार्गदर्शन मागणाऱ्या याचिकेवरदेखील त्याचवेळी सुनावणी होईल. श्रीनिवासन गेल्या २८ आॅगस्टच्या बैठकीत उपस्थित झाल्याने बोर्डाची बैठक गुंडाळण्यात आली होती. दरम्यान, मनोहर यांना पूर्व विभागातील सर्व सहा संघटनांचा पाठिंबा आहे. बीसीसीआयच्या पोटनिवडणुकीमध्ये मनोहर यांना पूर्व विभागातून केवळ एका प्रस्तावकाची गरज होती, पण त्यांना सर्व सहा संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे मनोहर एकमेव उमेदवार आहेत.मनोहर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणाऱ्यांमध्ये दिवंगत दालमिया यांचा मुलगा अभिषेक याचाही समावेश आहे. रविवारी होणाऱ्या आमसभेच्या विशेष बैठकीमध्ये अभिषेक कौटुंबिक क्लब असलेल्या नॅशनल क्रिकेट क्लबचे (एनसीसी) प्रतिनिधित्व करणार आहे. या व्यतिरिक्त मनोहर यांचा नावाचा प्रस्ताव देणाऱ्यांमध्ये बंगाल क्रिकेट संघटनेचे सौरव गांगुली, त्रिपुराचे सौरव दासगुप्ता, आसामचे गौतम राय, ओडिशाचे आशीर्वाद बेहडा आणि झारखंडचे संजय सिंग यांचा समावेश आहे. पूर्व विभागाचे एक प्रतिनिधी म्हणाले, ‘‘पूर्व विभागातीय सर्व सहा संघटनांनी मनोहर यांच्या नावाचा वेगवेगळा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला सर्वांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध होते.’’ मनोहर यांनी यापूर्वी २००८-२००९ आणि २०१०-२०११ या तीन वर्षांच्या कालावधीत बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. मनोहर यांच्या नियुक्तीमुळे श्रीनिवासन यांचे बीसीसीआयमध्ये २०१७ पर्यंत पुनरागमन होण्याची शक्यता धुसर झाली आहे. २०१७ मध्ये मनोहर यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रमुख अजय शिर्के यांनी मनोहर या पदासाठी योग्य उमेदवार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये ३१ पैकी २९ संलग्न संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते. राजस्थान क्रिकेट संघटना आणि जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटना यांना या बैठकीमध्ये सहभागी होण्याची मंजुरी नाही. दोन असोसिएट सदस्य छत्तीसगड राज्य क्रिकेट संघटना आणि मणिपूर क्रिकेट संघटना रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. (वृत्तसंस्था)अॅड. शशांक मनोहर हे प्रसिद्ध वकील असून २००८ ते २०११ या काळात पहिल्यांदा बीसीसीआयचे २९ वे अध्यक्ष बनले. स्वच्छ प्रतिमा, वक्तशीरपणा आणि शिस्तप्रिय कामासाठी ते ओळखले जातात. बोर्डाला एक प्रामाणिक अध्यक्ष देऊ, असे बोर्डाचे सचिव ठाकूर यांनी म्हटले होतेच. शशांक मनोहर यांनी यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले असून, या पदासाठी ते सक्षम व्यक्ती आहेत. अध्यक्षपदाची जबाबदारी ते योग्यपणे सांभाळतील, असा मला विश्वास आहे.- सौरव गांगुलीअध्यक्षपदासाठी मनोहर योग्य उमेदवार आहेत. पूर्व विभागातील सर्व सहा संलग्न संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. ते अनुभवी व प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यांची पार्श्वभूमी कायद्यासोबत जुळलेली असल्यामुळे सध्याच्या घडीला त्यांच्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार नाही.- अजय शिर्के
शशांक मनोहरांवर आज मोहर?
By admin | Updated: October 4, 2015 04:14 IST