कॅलिफोर्निया : डोपिंगच्या आरोपामुळे रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिला तात्पुरत्या निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. मारियावरील या कारवाईचे ब्रिटनचा अनुभवी टेनिसपटू अँडी मरे याने समर्थन केले आहे. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी येथे आलेला मरे म्हणाला, मारियासारख्या एखाद्या अनुभवी खेळाडूने प्रदर्शन वाढीसाठी प्रतिबंधित औषधांचे सेवन करावे, ही खेदजनक बाब आहे. तिने केलेल्या चुकीची शिक्षा मिळायला हवी.ब्रिटनचा स्टार खेळाडू पुढे म्हणाला, जानेवारीत मेलडोनियम या औषधावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर विविध देशांतील जवळपास ५५ खेळाडू डोपिंगमध्ये दोषी आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, हे औषध हृदयरोगासाठी उपयोगी ठरते. मात्र, एकाच वेळी एवढ्या खेळाडूंना हृदयरोग असेल असे वाटत नाही. त्यामुळे प्रतिबंधित औषधी सेवन करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई झालीच पाहिजे. विशेष म्हणजे यापूर्वी स्पेनचा अनुभवी खेळाडू राफेल नदाल यानेही मारियावर टीका करताना तिच्यावरील कारवाईचे स्वागत केले होते.
शारापोव्हाच्या निलंबनाचे अँडी मरेकडून समर्थन
By admin | Updated: March 12, 2016 03:16 IST