हैदराबाद : उमेश यादव (४ बळी) व अक्षर पटेल (३ बळी) यांच्या अचूक माऱ्यानंतर शिखर धवन (९१ धावा, ७९ चेंडू, ८ चौकार, १ षटकार) व विराट कोहली (५३ धावा, ४ चौकार, १ षटकार) यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर भारताने रविवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या तिसऱ्या लढतीत श्रीलंकेचा ६ गडी व ३५ चेंडू राखून पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजय आघाडी घेतली.भारताने श्रीलंकेचा डाव ४८.२ षटकांत २४२ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४४.१ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन व अजिंक्य रहाणे (३१ धावा, ५ चौकार) यांनी सलामीला ६२ धावांची भागीदारी करीत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर धवनने अंबाती रायडूच्या (३५ धावा, ३ चौकार) दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करीत भारताच्या विजयाची मजबूत पायभरणी केली. रायडू धावबाद झाल्यानंतर धवनने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने धावफलक हलता ठेवला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. शतकाकडे वाटचाल करणारा धवन चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. धवनविरुद्ध कुलसेकराच्या गोलंदाजीवर संगकाराने केलेले झेलबादचे अपील पंचानी उचलून धरले. रिल्पेमध्ये मात्र चेंडू हेल्मेटला चाटून गेल्याचे दिसत होते. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने अनुभवी सुरेश रैनाच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी करीत विजय निश्चित केला. आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहली बाद झाल्यानंतर रैनाने (नाबाद १८) वृद्धिमान साहाच्या (नाबाद ६) साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, माहेला जयवर्धनेच्या (११८) शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २४२ धावांची आव्हानात्मक मजल मारली.मालिकेत २-० ने पिछाडीवर असलेल्या श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जयवर्धनेच्या शतकी खेळीनंतरही श्रीलंकेचा डाव ४८.२ षटकांत २४२ धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेची सुरुवातीला २ बाद ७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर जयवर्धने (११८) आणि तिलकरत्ने दिलशान (५३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०५ भागीदारी करीत डाव सावरला. जयवर्धनेने १२४ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने ११८ धावांची खेळी केली. दिलशानने ८० चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकारांच्या मदतीने ५३ धावांचे योगदान दिले. माहेलाने सीकुगे प्रसन्नासोबत आठव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करीत श्रीलंकेला दोनशेचा पल्ला ओलांडून दिला. सुरुवातीला सुदैवी ठरलेल्या प्रसन्नाने २ चौकार व १ षटकार लगाविला. माहेला जयवर्धनेचा महत्त्वाचा बळी अश्विनने घेतला. प्रसन्नाला यादवने तंबूचा मार्ग दाखविला. श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात अपयश आले. कर्णधार अॅन्जेलो मॅथ्यूज (१०) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. भारतातर्फे उमेश यादवने ५३ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले तर अक्षर पटेलने ४० धावांत ३ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखविला. यागदवने कुशल परेरा (४), कुमार संगकारा (०), थिसारा परेरा (१) आणि प्रसन्ना (२९) यांना बाद केले तर अक्षर पटेलने अॅन्जेलो मॅथ्यूज (१०), अशान प्रियंजन (२) आणि चतुरंगा डी सिल्वा (२) यांना माघारी परतवले. अंबाती रायडूने १६ धावांच्या मोबदल्यात एक बळी घेतला. त्याने दिलशानला बाद केले. (वृत्तसंस्था)
मालिका खिशात
By admin | Updated: November 9, 2014 23:07 IST