कोल्हापूर : पालकमंत्र्यांच्या घरावर उद्या, शनिवारी येणारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मोर्चा भाजपचे कार्यकर्ते अडविणारच. यावेळी कोणी जर आततायीपणा करून कायदा हातात घेऊन गुंडागर्दी केली, तर मोर्चा अडविण्यासाठी झेंड्याचा दांडा मजूबत असेल हे ध्यानात ठेवावे, असा इशारा गुुरुवारी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी दिला.भाजपच्या बिंदू चौक येथील कार्यालयात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत तीव्र प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. जिल्हा संघटन सरचिटणीस बाबा देसाई, जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, अॅड. संपतराव पवार, संतोष भिवटे, नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, प्रभा टिपुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.महेश जाधव म्हणाले, पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या २००० कोटी रुपयांच्या पॅकेजची अंमलबजावणी होण्यास वेळ लागणार याची जाणीव आहे. तरीही ते पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा अट्टहास का करीत आहेत? भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार हे लोकहिताचे व भ्रष्टाचारविरोधी आहे. हे सरकार प्रामाणिक व शुद्ध भावनेने काम करीत असल्यामुळे राष्ट्रवादीतील मुश्रीफ यांच्यासारख्या प्रवृत्तींना मोकळा श्वास घेणे बंद झाले आहे. त्यांच्या कारकिर्दीत नांद्रे, वसगडे, इंदापूर, मावळ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोर्चावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सरकारने गोळ्या झाडून शेतकऱ्यांची हत्या केली. ही लोकशाही व सरकार चालविण्याची रीत मुश्रीफांच्या पक्षाची आहे, हे त्यांनी विसरू नये.साखर कारखान्यातील गैरव्यवहार व शेतकऱ्यांच्या बाजूने मोर्चा काढला म्हणून खुद्द मुश्रीफ यांनी राजेंद्र गड्यान्नावर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्यांनी वीस हजार लोकांचा मोर्चा काढण्याची भाषा केली आहे; परंतु त्यांनी बाजीप्रभूंनी तीनशे मावळ्यांना सोबत घेऊन पावनखिंड लढविल्याचे ध्यानात घ्यावे. शिवराज्याभिषेक दिनाच्या पवित्र दिनी मोर्चाचा अट्टहास म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर स्टंटगिरीच आहे.बाबा देसाई म्हसणाले, १५ वर्षे जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्याय केल्यानंतर याच जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचले. त्यामुळे जनतेचा कळवळा घेऊन पूर्वीचे पाप दुसऱ्याच्या माथी मारण्याचे नियोजन मुश्रीफ यांनी केले आहे. भाजप हा मोर्चा सक्षमपणे अडवून दाखवील. यावेळी आर. डी. पाटील म्हणाले, भाजपचा कार्यकर्ता स्वाभिमानी व निष्ठावंत असून दादांच्या घरावरील मोर्चाला उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. यावेळी अशोक देसाई, राहुल चिकोडे, विजय जाधव, संदीप देसाई, प्रभावती इनामदार, हेमंत आराध्ये, आदी उपस्थित होते.
सेरेना-लुसी अंतिम लढत
By admin | Updated: June 5, 2015 01:01 IST